माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना ४ वर्षाचा तुरुंगवास

नवी दिल्ली : २७ मे – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाने चार वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे चौटाला यांनी आजारी असल्याने आणि केस जुनी असल्याने सहानुभूती मागितली होती. त्याचबरोबर भ्रष्टाचार हा समाजासाठी कर्करोगासारखा आहे, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने अशी शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात एक आदर्श निर्माण होईल, असे सीबीआयने म्हटले होते.
न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना तीन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागणार आहे. मात्र, ते जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागू शकतात, जिथून त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, चौटाला १९९३ ते २००६ दरम्यान ६.०९ कोटी रुपयांची (त्यांच्या वैध उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा) संपत्ती जमा करण्यासाठी जबाबदार आहेत. मे २०१९ मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने ३.६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. चौटाला यांना जानेवारी २०१३ मध्ये जेबीटी घोटाळ्यातही दोषी ठरवण्यात आले होते. २००८ मध्ये, चौटाला आणि इतर ५३ जणांवर १९९९ ते २००० या कालावधीत हरियाणामध्ये ३ हजार २०६ कनिष्ठ मूलभूत प्रशिक्षित शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते.

Leave a Reply