११० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या पोलीस भवनाची पहिल्याच पावसात झाली वाताहत

नागपूर : २५ मे – एखादी इमारत एकशे दहा कोटी रुपये खर्चून उभारली आहे असं म्हटल्यावर तुमच्या नजरेसमोर कदाचित एखाद्या भव्य दिव्य महालाची प्रतिमा उभी राहील. नागपुरात एकशे दहा कोटी खर्चून उभारलेले पोलीस भवन ही दिसायला तेवढेच भव्य दिव्य. मात्र, एका पावसाने या भव्य दिव्य महालाची पोलखोल केली आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे या इमारतीचे फॉल सिलिंगचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.
नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या पोलीस भवनाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन 29 एप्रिलला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडले. देखणी आणि भव्य वास्तू पाहून अजितदादाही तिच्या प्रेमात पडले होते आणि राज्यातील सर्वात देखणी पोलीस वास्तू असे प्रमाणपत्रच त्यांनी दिले.
मात्र केवळ 26 दिवसानंतर अवघ्या अर्धा तास बरसलेल्या पावसाने आणि मध्यम स्वरूपाच्या वाऱ्याने या इमारतीची आतून वाईट अवस्था केली. काल संध्याकाळी चार ते साडेचार दरम्यान बरसलेल्या पावसामुळे पोलीस भवनाच्या दोन्ही विंगमध्ये पहिल्या, तिसऱ्या चौथ्या आणि सहाव्या माळ्यावरचे फॉल्स सिलिंग खाली कोसळले. सुदैवाने यात कोणताही कर्मचारी जखमी झाले नाही. मात्र, उद्घाटनाला अवघे 26 दिवस झालेल्या इमारतीत असे काही घडू शकेल याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आता एवढ्या सोयींनी सुसज्ज इमारतीत एका पावसाने आणि मध्यम स्वरूपाच्या वाऱ्याने असे थैमान का घडले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे उत्तर कदाचित इमारतीच्या डिझाईन मध्येच असावे. चौकोनी स्वरूपात बांधलेल्या या इमारतीच्या मधल्या भागात मोकळी जागा आहे. याच मोकळ्या जागेच्या वरती (सहा मजल्यांच्यावर) डोम बनवण्यात आले आहे. त्या डोममधून इमारतीत नैसर्गिक उजेड आणि वारा खेळता राहावा यासाठी जागा ठेवण्यात आली आहे. त्याच जागेतून वादळाच्या वेळेला वारा आत शिरून अवतीभोवतीच्या सहाही मजल्यांवर वारा शिरतो अशी शक्यता आहे.
मंगळवारच्या पावसानंतर ज्या-ज्या मजल्यावर फॉल्स सिलिंग खाली पडली आहे, त्या ठिकाणी दुरुस्तीचे कार्य सुरु करण्यात आले आहे. तसेच थोड्याशा पावसाने इमारतीत झालेल्या नुकसानीची माहिती संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली आहे. आता कंत्राटदार आणि बांधकाम तज्ज्ञ इमारतीत सोसाट्याचा वारा आत शिरणार नाही यासाठी काय उपाय योजतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र, अवघ्या 26 दिवसात 110 कोटींच्या इमारतीत असे घडणे योग्य नाही हे गृह विभागाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply