देवेंद्र फडणवीसांच्या कपटनीतीपासून महाराष्ट्राने सावध राहावे – अमोल मिटकरी

अकोला : २५ मे – राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून शरद पवार संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावे असे बोलतांनाच महाराष्ट्राला फडणवीसांच्या कपटनीतीपासून सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.
अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “देवेंद्र फडणवीसांनी आता महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत. कधीही उठसूठ शरद पवारांबद्दल काहाही बोलायचं. ज्ञानवापी मंदिर, ओबीसी आरक्षण आणि आता संभाजीराजेंच्या नावानेही राजकारण करुन मराठा, ओबीसी यांना पवारांविरोधात उभं कऱण्याचे आगलावे धंदे फडणवीसांनी बंद करावेत”.
“देवेंद्र फडणवीसांना सगळीकडेच पवारच दिसतात का? त्यांच्या वक्तव्याला काही आधार नाही, अगदी बिनबुडाचं वक्तव्य आहे. शरद पवारांबद्दल बोलताना त्यांनी भान ठेवावं आणि यापुढे जर कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही. फडणवीसांचं हे आग लावणारं वक्तव्य असून त्यांच्या कपटनीतींपासून महाराष्ट्राने सावध राहावं,” असा सल्ला मिटकरींनी यावेळी दिला.
संभाजीराजेंची कोंडी झालीये का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “संभाजीराजेंनी कोणत्याही पक्षात जाणार नाही आणि अपक्ष निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी महाराष्ट्र स्वागत करेल. एकेकाळी ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले होते, मागील वेळी भाजपाच्या कोट्यातून खासदार झाले. आता शिवसेनेची काही ठराविक मतं होती, त्यांनी पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. शरद पवारांनी पाठिंबा दिला असताना कोंडी केल्याचं म्हणण्याचा फडणवीसांना काय अधिकार आहे? इतकाच जर त्यांना संभाजीराजे आणि गादीबद्दल आदर आहे तर त्यांना सन्मानाने आपल्याकडे घ्यावं. कोंडी झाली हे पेरण्याचं काम जे फडणवीस करत आहेत ते आग लावण्याचं काम आहे”.

Leave a Reply