दावोस आर्थिक परिषदेतून विदर्भात ३ हजार ५८७ कोटींची गुंतवणूक

नागपूर : २५ मे – दावोस येथे २२ ते २६ मे दरम्यान आयोजित आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांतील २३ कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. यात विदर्भातील सहा कंपन्यांचा समावेश आहे. यानिमित्ताने विदर्भात ३ हजार ५८७ कोटींची गुंतवणूक होणार आहे.
राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आर्थिक परिषदेदरम्यान महाराष्ट्र दालनात सामंजस्य करार झाले. विविध करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती-तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्याशिवाय विदर्भातील इंडोरामा, जीआर कृष्णा फेर्रो एलॉयज प्रायव्हेट लिमिटेड, कलरशाइन इंडस्ट्रीज, गोयल प्रोटीन्स लिमिटेड, अल्प्रोज इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, विश्वराज एन्व्हॉयर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांनी बुटीबोरी, मूल, उमरेड, अतिरिक्त बुटीबोरी, चंद्रपूर येथील एमआयडीसीमध्ये प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे.
याशिवाय अमरावतीमधील टेक्सटाइल्स पार्क येथेही टेक्सटाइल इंडस्ट्री येणार आहे. गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या या टेक्सटाइल्स, स्टील, फ्युएल इथेनॉल, ऑइल एक्स्ट्रॅक्शन क्षेत्रातील आहेत. या सर्व कंपन्यांमुळे ४ हजार ८३४ जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. याबाबत अधिक सांगताना विश्वराज इन्व्हॉयर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख अरुण लखानी म्हणाले, ‘आमच्या कंपनीद्वारे पर्यावरणपूरक प्रकल्प सुरू आहेत. त्याचाच पुढील भाग म्हणून आता ग्रीन फ्युएलची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दावोस येथील परिषदेत सामंजस्य करार करण्यात आला.’ सामंजस्य करारप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आदी उपस्थित होते.

Leave a Reply