आपण एक साधू झाले , येर कोण वाया गेले ? – प्रकाश एदलाबादकर

11 mar prakash edlabadkar

आज वैशाख वद्य दशमी . भागवत धर्माच्या परंपरेतील आद्य संत कवयित्री मुक्ताबाई हिचा आज समाधीदिन . त्यानिमित्त तिच्या विचारांचा हा वेध

एखाद्याच्या जीवनातील पराभवाच्या किंवा संभ्रमाच्या क्षणी त्याला दूषणे देणे आणि त्याचा अवसानघात करणे ही अत्यंत सोपी बाब आहे .परंतु त्याचे मनोबल वाढवून त्याला दिलासा देणे फार कठीण आहे . मन खट्टू होण्याचे , संभ्रम निर्माण होण्याचे , अवसान गळून पडण्याचे ,किंकर्तव्यमूढ होण्याचे ,दिशाहीन होण्याचे असे अनेक प्रसंग व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात . त्यावेळी त्याला ,त्याच्या अंतरंगातील कौशल्याची जाणीव करून द्यावी लागते . त्याच्या आतील शक्तीची ओळख करून द्यावी लागते . संभ्रमावस्थेने किंवा अन्य कोणत्याही कारणाने व्यक्ती स्वतःचीच ओळख विसरते . त्याच्या आतील आत्मशक्तीचा त्याला विसर पडतो. तो दिशाहीन होतो. अशावेळी त्याला कुणीतरी सांभाळून घेणारे हवे असते . त्याला योग्य मार्ग दाखविणारे हवे असते. एकदा का त्याला ,त्याच्या अस्तित्वाची आणि त्याच्या प्रयोजनाची जाणीव झाली की , अशी व्यक्ती महान कार्य करून जाते . असे दीपस्तंभ आणि मार्गदर्शक आज समाजात हवे आहेत . प्रत्यक्ष महाबली हनुमंतालाही त्याच्या शक्तीची आठवण जांबुवंताने करून दिल्याची त्रेतायुगातील कथा आहे . युद्धापासून निवृत्त होण्याच्या मनःस्थितीत असलेल्या ,अर्जुनासारख्या महापराक्रमी धनुर्धराचा मोह नष्ट करून भगवान श्रीकृष्णाने त्याला ,त्याच्या निहित कर्माची जाणीव करून दिली आणि युद्धप्रवृत्त केले ही कथा द्वापारयुगात आहे ……

जाम्बुवंताने हनुमंताला केलेल्या उपदेशाने रामायणाची दिशा बदलली . भगवंताने अर्जुनाला केलेल्या उपदेशाने महाभारताने वेगळेच वळण घेतले . अगदी तसेच संत मुक्ताबाईने करुणासागर ज्ञानदेवांना केलेल्या उपदेशाने महाराष्ट्राच्या भाग्याला उज्ज्वल वळण मिळाले .ही कथा कलियुगात घडलेली आहे .सातशे वर्षांपूर्वी . गावात माधुकरी मागायला गेलेल्या ज्ञानोबांच्या झोळीत ,गावातील विघनसंतोषी मंडळींनी शेणमाती कालविली . आपल्या झोळीत लोकांनी कालविलेल्या शेणमातीने तो शांतिब्रह्म योगीश्वर संतापून गेला , दुखावला . आपल्या झोपडीत जाऊन बसला . झोपडीची ताटी बंद केली . नदीवरून परतलेल्या मुक्ताईने ती बंद ताटी पहिली . ती ब्रम्हचित्कला आदिशक्ती होती . तिला परिस्थितीची कल्पना आली .तिने ज्ञानोबांची समजूत काढली .त्यांच्या अंगीकृत ईश्वरी कार्याची आठवण करून दिली . तेच ‘ताटीचे अभंग ‘ ! कुणाच्याही सुखाच्या झोळीत माती कालविण्याचे कसब असलेली मंडळी आजही समाजात विद्यमान आहेत .सर्वच क्षेत्रात असे लोक आजही आहेत . पण ज्यांच्या झोळीमध्ये आजही अशी विघ्नसंतोषी माती कालविली जाते ,त्या प्रत्येकाच्या वाट्याला मुक्ताई येतेच असे नाही . मायेचा अपरंपार ओलावा मनात साठवून ,वाणीने मात्र अत्यंत परखड आणि यथातथ्य उपदेश करणे ह्या वृत्तीलाच मुक्ताई म्हणतात . ह्या वृत्तीला कोणत्याही व्यावहारिक लोभाची आस नसते . आपपरभावाच्या पल्याड गेलेली ,नातेसंबंधांच्या पलीकडे पोचलेली ही माया असते . हा अधिकार होता मुक्ताईचा . आज वैशाख वद्य दशमी . संत मुक्ताईचा समाधी दिन . म्हणून तिची आठवण !

मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ ।सर्वत्री वरिष्ठ आदिशक्ती ।।
जगाच्या उद्धारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढजन /।।
अज्ञानासी बोध सज्ञानासी शुद्धी ।तोडिली उपाधी सर्वत्रांची ।।
लडिवाळ तान्हे एका जनार्दने ।कृपा असो देणे मजवरी ।।

नाथ महाराज म्हणतात ते खोटे कसे असेल बरे/? ज्ञानदेवांना त्यांच्यातील योगसामर्थ्याची ,संतत्वाची ,एका यथार्थ अधिकाराने मुक्ताईने जाणीव करून दिली .ताटीचे अभंग हे त्याचे शब्दरूप आहे . मुक्ताई ,ज्ञानोबांना ते संत असल्याची जाणीव करून देतात . त्यांना त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून देतात . त्यांचे आत्मभान जागृत करतात ताटीच्या अभंगांचा एकूण सूर जरी विनवणीचा असला तरी, त्यात आग्रह ,आर्जव आणि ज्ञानाचा अधिकार आहे . मोठ्या भावाचा रुसवा दूर करणारी लडिवाळ बहीण असे जर ह्या उपदेशाचे दृश्य रूप असेल तर ,एका योगिनीने दुसऱ्या एका योगीश्वराला त्याचा साधनेची आणि कर्तव्याची जाणीव करून देणे हे त्याचे अंतर्निहित रूप आहे .अत्यंत महत्वाचे म्हणजे यातून मुक्ताईने संतलक्षणे सांगितलेली आहेत …….

योगी पावन मनाचा । साही अपराध जनांचा ।।
विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ।।
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।।
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

मुक्ताई ही सर्व भावंडात लहान आहे . निवृत्ती ,ज्ञानदेव आणि सोपान यांची ती लहान बहीण आहे ,असे म्हणण्यापेक्षा हे तिघे, तिचे मोठे भाऊ आहेत असेच म्हणावे लागेल . तिचा अधिकार असामान्य होता .” ज्या सामान्य लोकांचा उद्धार करायला तुझा जन्म झाला आहे ,त्यांचा राग कशाला करतोस ?”असा प्रश्न विचारत ती ज्ञानोबांना म्हणते ,” तुला जगाचा आणि जगायचा कंटाळा आला ? असा विचार योग्य नाही .तुझी आजवरची साधना ह्या जगाच्या उद्धारासाठीच कामी येणार आहे .आता तुला आलेला जगाचा राग त्यांच्याच कमी येणार . तुला कुणाशीही बोलावेसे वाटत नाही ना ,मग नको बोलू की कुणाशी . स्वतःशी बोल . मग आपोआप सगळ्यांशी बोलायला लागशील . तू साक्षात ज्ञानाचा अवतार आहेस . ज्ञानच आमच्यावर रुसून बसले तर आम्ही जायचे कुठे ?”

संत तोचि जाणा जगी ।दया क्षमा जायचे अंगी ।।
लोभ अहंता नये मना ।जागी विरक्त तोचि जाणा ।।
इह परलोकी सुखी ।शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी ।।
मिथ्या कल्पना मागे सारा ।ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

ताटीच्या अभंगात मुक्ताई ही ज्ञानदेवांची लहान बहीण राहिलीच नाही . ती झाली हाती त्यांची आई ! तो संवाद केवळ दोन बहीण भावांचा नव्हता तर , नाथपंथातील दोन सिद्ध साधकांचा होता . परंपरमध्ये प्रक्षेपक अभंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताटीच्या अभन्गातून मुक्ताईने संपूर्ण योग उभा केलेला आहे . मुक्ताईने केलेला हा उपदेश म्हणजे एकप्रकारे भागवत धर्माची विचारपरंपराच आहे . ज्ञानदेवांच्या हातून ” सुखसागर आपण व्हावे ।जग बोधे निववावे ” या उक्तीला अनुसरून लोकोद्धार घडला . हे सुखसागर होणे सोपे नसते . त्याला आवश्यक असते सहनशीलता .ताटीच्या अभंगांच्या निमित्ताने मुक्ताईने ज्ञानोबांना ही सहनशीलता,ही सहनसिद्धी दिली असे नाही का वाटत ? आज समाजात आणि कुटुंबातही ही सहनशीलता नष्ट झालेली आहे . प्रत्येकच जण फक्त आणि फक्त स्वतःभोवतीच गरगरतो आहे . स्वार्थ हाच एकमेव परमार्थ झाला आहे . आपले भले व्हावे हे प्रत्येकालाच वाटते पण, त्याच सोबत इतरांचेही भले व्हावे ही भावनाच नष्ट झालेली आहे .अशा वेळी मुक्ताईचेच शब्द आठवतात .

एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले ।।
उठे विकार ब्रह्मी मूळ ।अवघे मायेचे गबाळ ।।
तेथे कोणी शिकवावे । सार साधुनिया घ्यावे ।।
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्दलाचे ठायी ।।
तुम्ही तरून विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

करुणेचा सागर असलेला तो शांतिब्रह्म योगीश्वरही संतापून जावा अशी मंडळी त्या काळात होती . त्यांची वळवळणारी पिलावळ आजही समाजात आहे, फक्त नाही ती मुक्ताई ! तिच्या उपदेशानेच माऊलीच्या मनात करुणा जागृत झाली . स्वतःसोबत अवघ्या मानवजातीचे कल्याण करणारी भावार्थदीपिका त्यांचा मुखातून प्रगट झाली. विश्वाचे आर्त प्रगट झाले .

मग आर्ताचेनि वोरसे ।गीतार्थ ग्रथनमिसें ।
वर्षला शांतरसे ।तो हा ग्रंथु ।।

अशी भावार्थ दीपिका -ज्ञानेश्वरी निर्माण झाली . महाराष्ट्राच्या मातीचा उद्धार करून गेली . याला कारण मुक्ताईचा उपदेश , तिचे द्रष्टेपण !! मुक्ताईचे आयुष्य होतेच किती ?अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ चा जन्म आणि वैशाख वद्य दशमी शके १२१९ हा समाधी दिन ! लौकिक वय म्हणाल तर अवघे पावणेअठरा वर्षाचे आयुष्य . चांगदेवांना तिने केलेला उपदेश , संत नामदेवांचे केलेले अहंकारहरण , तापी नदीच्या तीरावर फुलविलेला भक्तीचा मळा ,असे अनेक प्रसंग तिच्या लौकिक आयुष्यात घडले . या प्रसंगांवर एकेक ग्रंथ लिहिता येईल . संत नामदेव समाधी प्रकरणात लिहितात की , संत निवृत्तीनाथांनी तिला विचारले …..

निवृत्तीने एकांत केला मुक्ताईसी । गमन कोणे एके दिवशी आरंभिले ।।
मुक्ताई म्हणे जावे यावे कोठे ।अवघे निघोट स्वरूप स्वामी ।।
गर्जता गगन कडाडली वीज । स्वरूपी सहज मिळियेली ।।
मावळला दीप ज्योत कोठे होती ।सहज सामाविती निरंजनी ।।

ऐन वैशाखाच्या जळत्या उन्हात ,तापीतीराच्या वाळवंटावरील कोरड्या ठण्ण आकाशात ढग दाटून आले . गडगडाट झाला . प्रचंड कडकडाटासह विजेचा चकाकता प्रचंड लोळ वाळवंटी आला आणि मुक्ताई त्यात विलीन झाली .
संत नामदेव लिहितात ..

कडाडली वीज निरंजनी जेव्हा । मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ।।
वैकुंठी लक्षघंटा वाजती एक घाई ।झाली मुक्ताबाई स्वरूपाकार ।।
नामा म्हणे देवा कैचे आता काही ।आम्हा मुक्ताबाई बोलली नाही ।।

प्रकाश एदलाबादकर , नागपूर

Leave a Reply