सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

ब्राम्हण संघटनांची मिटींग – एक खणखणीत इशारा

रोज नवनवीन खेळींनी बहरत जाणारं महाराष्ट्राचं राजकारण. शिवसेनेला भाजपा पासून तोडल्यानंतर आता शिवसेनेची अवस्था दोन्ही तंगडं तुटलेल्या वाघागत सरपटत चालली आहे तर दिशादर्शक दोन पट्टा धारी. मुख्यमंत्री म्हणविणारा इसम घराबाहेर पडत नाही. राजकारणाचे महत्वाचे निर्णय घेत नाही. वक्तृत्वात दम नाही. भाषण देताना अभ्यास नाही. चार नेहमीचे थातुरमातुर शब्द कोंबुन कसे तरी दम नसणारे भाषण करणारा इसम. काकांच्या खेळीने पुरता जायबंदी झालेला पक्ष शिवसेना.
ज्या युतीने एकसंध बहुमत आणले त्या युतीला तोडून फडणवीसांच्या तशरफी खालची मुख्यमंत्री पदाची खुर्ची अलगद काढून घेणारे काका. पन्नास वर्षे ज्यांची राजकारणात झाली आणि ह्याच्या बरोबर तर कधी त्याच्याबरोबर सत्तेत नेहमी सहभाग राहिला. पण स्वतंत्र राकॉं चा आपला मुख्यमंत्री बनविण्याचा मान आजतागायत मिळु शकला नाही. असे अवमान करुन फडणवीसांनी काकांमधला वाघ जागवला. आणि काकांना त्या संधीचे सोने केले. आठवते फडणवीस म्हणाले होते की आमचे पहिलवान तेल लावून सज्ज आहे पण आम्हाला कोणी प्रतिस्पर्धी समोर दिसत नाही”! त्या वेळी काकांनी एकच् उत्तर दिले होते की मी ऑर्गनायझर आहे. म्हणजे कुस्त्यांचे आयोजन मी करतो. मी कुस्ती लढत नाही. मी कुस्त्या लढवतो. आणि मुख्यमंत्री पदाच्या गादीत काकांनी फडणवीसांना अलगद गारद केले.
त्यावेळी असे म्हणतात की गडकरी साहेबांनी मानाचा एक सल्ला फडणवीसांना दिला होता की तू काकांच्या मागे लागू नकोस. झोपल्या वाघाला जागवू नकोस. एकदा काकांमधला वाघ जागला तर तुला पळता भुई थोडी होणार. ह्या सल्ल्याकडे फडणवीसांनी काणा डोळा केला आणि आज आपण बघतोय महाराष्ट्रात काय चालले आहे. “मी पुन्हा येईन” हा हास्याचा विषय झाला आहे.
ह्या अडीच वर्षात राकॉं वर अनेक प्रहार करण्यात आले. काका म्हणजे पन्नास वर्षे आणि तीन जिल्ह्याचे नेते. मग त्यांची तुलना अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी ह्यांचे सोबत करण्यात आली. बघा, ही दोघे स्वतंत्र पक्षाचे पक्षधर आज मुख्यमंत्री झालेत आणि तुम्ही पन्नास पंचावन्न च्या वर आमदार नाही की कधी राकॉं स्वबळावर मुख्यमंत्री आणू शकली नाही.
वाचकहो! जो नेता पन्नास वर्षे वयाची राजकारणात घालवतो. आपल्या कुटुंबियांचे बस्तान राजकारणात बसवतो. राजकारणात ज्याच्या शब्दाला मान आहे. राजकारणातील “त” वरून ताकभात ओळखण्याची क्षमता आहे. असे समयाधीश झोपी गेले असताना तुम्ही खाजवून खाजवून जागवला. भाजपा ची सत्तेची हक्काची पाच वर्षे काकांनी काढून घेतली. भाजपा च्या बुडाखाली संजय राऊतांना घेऊन राजकारण शिजले आणि बोथट नाकाच्या भाजपा नेत्याला शिजलेल्या राजकारणाचा वास ही येवू नये ! भाजपा सत्ता हीन केली गेली! ह्यात चुक कोणाची? ज्या मतदाराने मोदी शिवसेना युतीला मत दिले त्या मतदाराची तर निश्चितच नाही.
ज्या फडणवीसांनी काकांना जागविले त्या फडणवीसांनी पुन्हा सत्तेत “मी पुन्हा येईन” हा नारा अधुराच् राहणार का? होय! शिवसेनेचे हिंदुत्व पुर्णपणे नागवल्यानंतर, शिवसेनेला नामोहरम केल्यानंतर, शिवसेनेच्या राजकिय खेळींच्या गोट्यांची नाकाबंदी केल्यावर. वेळ आली आली ती महाराष्ट्रात एकछत्री अंमल राकॉं चा आणण्याची. त्यासाठी काकांचे पन्नास वर्षाचे अनुभव, जोडीला प्रशांत किशोर चे राजकारणी डाव. ह्या सर्वांची बामणी कढी आता हळूहळू शिजायला लागली आहे. बघायचे भविष्यात काय होते?
राज ठाकरेला समोर करणारे कोण? आतापर्यंत खूप गदारोळ, हल्लकल्लोळ, संशयाचे वादळ निर्माण करण्यात आले आहे. राज ठाकरेंचा बोलविता धनी म्हणजे भाजपा किंवा शिवसेना असा भ्रम की वास्तव अशी संशयाची पाल मतदारांच्या डोस्क्यात भिनविली आहे. आणि ह्या अडीच वर्षात व्यथित मतदार जो भाजपा कडे लोटला होता त्या गठ्ठा हिंदू मतांचा कडेलोट करण्याचा चंग काकांनी बांधला दिसतोय आणि एकावर एक चाली खेळून भाजपाची दमछाक करण्याची कुठलीच कसर काका सोडत नाहीएत.
आज पेडणेकर ताई म्हणाल्यात इतके सारे १०-१२ गाड्यांचे रेल्वे तिकीट बुक झालीत! कोण आहे ह्यांना स्पॉंसर करणारा? संदर्भ राज ठाकरे – अयोध्या प्रायोजित दौरा. राजनैतिक इच्छाशक्ती असेल तर शोधून काढणे सोपे असते! पण जर सर्वांनी ठरविले की मतदारांना भ्रमातच् ठेवायचे आहे तर मात्र पत्रकार देखील मालकाला पाहिजे तेव्हढा रकाना भरुन, आपले कर्तव्य बजावल्याचे दाखवून मालकाचा मान राखतात. वास्तविक परिस्थिती काय? कोणालाही घेणे देणे नाही. राज ठाकरे स्वतः एवढा पैसा खर्च करणार नाही हे एक वास्तव. भाजपा जर १०-१२ गाड्यांचे तिकीट काढणार असेल तर भाजपाचा खासदार ह्यांना विरोध का बरं करेल? म्हणजे राज ठाकरेंनी उचललेले हिंदुत्वाचे मुद्दे आणि भाषणाची लकब जरी भाजपा स्पॉन्सर दर्शविली होती तरी तो एक मतदारांना भ्रमित करण्याचा डाव होता. एवढी बाब निश्चित होते असे म्हणण्याला वाव आहे.
आता राहिले शिवसेना पक्षप्रमुख आणि मनसे पक्षप्रमुख दोघांचे संबंध. दोन्ही भाऊ राजकारणातले पिल्लू. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वलय खुप मोठे होते. त्यांच्या हिंदुत्वाच्या कल्पना, वास्तविक हिंदुत्व, हिंदुत्वासाठी तळमळ आणि हिंदुत्वासाठी राजकीय तडजोड. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक जहाल हिंदुत्ववादी परिपक्व नेतृत्व. मात्र ती धग दोन्ही भावांमध्ये नाही. बाळासाहेबांचे वलय दोन्ही भावांना चाखायचे आहे. महत्त्वाकांक्षा उत्तुंग पण अंगी गुण शुन्य अशी अवस्था आहे. त्याचा फायदा कसा उचलायचा हे चतुरस्त्र चतुर राजकारण्याला सांगायचे नसते. पहिले शिवसेना घशात घातल्यावर, एक गोष्ट पक्की झाली. हे जे संजय राऊत टीव्हीवर म्हणत असतात ना! आम्हाला हिंदुत्व शिकवू नये! ह्यांची सत्ता मिळाल्यानंतर ची देहबोली आणि अडीच वर्षे पुलाखालून पाणी वाहून गेल्यानंतरची देहबोली बघा. बरेच काही सांगून जाते. बरे! गंमत म्हणजे सर्वात वाईट परिस्थिती उद्भवली तर संजय राऊत राकॉं मध्ये जाऊ शकतील. पण हाच् दरवाजा उद्धवजींसाठी बंद आहे. राज ठाकरेंसाठी बंद आहे. म्हणजे उद्या मनसे, शिवसेना निवडून आले तरी राकॉं अधिपत्याखाली राहणार आणि जाहीर आहे की दोघांपैकी एक जण सुद्धा मुख्यमंत्री बनणार नाही. कारण राकॉं पक्षाध्यक्ष त्यांना बहाल करणार नाही. जर निवडून आले तरी राकॉं चा इतिहास बघा, स्वतः च्या घरातील नेता मुख्यमंत्री पदी बसविण्याकडे कल राहणार.
गडकरी साहेब झाले, फडणवीस साहेब झाले हे दोघे ही ब्राम्हण पण फक्त ३ टक्क्याचे ब्राम्हण म्हणून ह्या दोन्ही नेत्यांनी ब्राम्हण समाजाला डावललेले. असे म्हणतात की ह्या दोन्ही नेत्यांचे राजकारण मराठा, कोष्टी, कुणबी, आरक्षीत समाज ह्या समाजांना प्राधान्य देण्यात व्यस्त. ब्राम्हण वर्ग आपल्याला मतं देतो, असे गृहीत धरून चालणारे हे दोन्ही नेते. २-३ वर्षाअगोदर तर हे दोन्ही नेते आपले म्हणणे ऐकत नाही म्हणून “NOTA” दाबून भाजपा ला धडा शिकविण्याइतपत येवून ठेपलेले.
मात्र जाती जाती म्हणजे प्रत्येक जातीचे ऐकणे आवश्यक आहे हे काकांना पटलेले. आपला मुख्यमंत्री आणायचा तर टक्का टक्का मतदाराला महत्व हे जाणून काकांनी “ब्राम्हण संघटनांना” आवाहन केले. ब्राम्हण – कसेल त्याची जमीन – कुळकायदा अशी नवनवीन क्लृप्त्या लावून नागवलेल्या ब्राम्हणांची पन्नास वर्षातल्या राजकारणी काकांना पहिल्यांदाच आठवण झाली. खऱ्याखुऱ्या ब्राह्मण महासंघानी जरी भेटण्यास नकार दिला तरी जो ब्राह्मण महासंघ त्यांना भेटण्यास राजी झाला, त्यातील मंडळी फारशी ओळखीची नसली तरी त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या आधारे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही काका समर्पित ब्राम्हण मंडळी असावी. हा मनोज कुळकर्णी – राज्याचा समन्वयक – समस्त ब्राम्हण समाज आज मिटींग झाली आणि ह्या साहेबांना गवसले की आजपर्यंत आमचे मनभेद होते मतभेद नव्हते. आणि एकाच् भेटीत ते दूर झालेत. साहेबांनी जमलेल्या बामनांच्या (मी काही चुक लिहीले नाही. बामन हा बाज ब्राम्हण समाजाला हिणवायचा असला की ब्राम्हणेतर जातीचे लोक वापरतात) सर्व मागण्यांना आश्वासनांचे कोंदण लावून मान्य केले आणि तथाकथित ब्राम्हण समाजाची पहिली मिटींग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ब्राम्हण समाजाला समज देण्यात आली की तुम्हाला बोलावले ते ब्राह्मण मतं वळवायला. उगीच आरक्षणावर कोकलू नका. आणि दिलेल्या आरक्षणांवर ओरडू नका.
कटाक्ष कळतोय का मित्रांनो! आठवतंय! भाजपा सत्तेत आले तर बिहारमधील आरक्षण रद्द करणार! हा चुकीचा वणवा पेटविण्यात आला आणि भाजपाचा दणदणीत पराभव झाला. आज कटाक्षाने सांगण्यात आले,” ब्राम्हणांनो आरक्षणासाठी कोकलु नका. मराठ्यांचे आरक्षण, ओबीसी आरक्षण दोन्ही मुद्दे राजकारणासाठी तेवत ठेवले आणि योग्य वेळ आली की त्याचा उपयोग मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी केला जाणार. एकएका जातीला काका हळूहळू आपल्या जवळ करीत आहेत. आपला जातीवान मतदार वाढवीत आहेत.
ज्या ब्राम्हण समाजाला भाजपा महाराष्ट्र नेत्यांनी हलक्यात घेतले त्या ब्राम्हण समाजाला तोडण्याचे काम काकांनी सुरू केले आहे. मान्य! खरा इतिहास ज्याला माहिती आहे तो ब्राह्मण समाज मतांसाठी राकॉं कडे वळविणे खुप जिकीरीचे काम. पण इतिहास बदलविण्यात माहिर काका , राजकारणात काहीही करू शकतात. राजकारणात काहीही होऊ शकते.
मात्र आरक्षणाचा मुद्दा उचलून काकांनी स्पष्ट संकेत दिले आहे की यापुढे आरक्षण विरुद्ध अनारक्षण असा वाद पेटवला जाऊ शकतो. जाती जातींना आपला मुद्दा रेटायला लावणार आणि मतं राकॉं कडे वळविले जाण्याचे राजकारण खेळले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
ह्या सर्व प्रकरणात राकॉं पक्षाध्यक्षाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना बीएमसी साठी नेहमी शिवसेनेला सपोर्ट करण्याचे वचन दिले होते जे त्यांनी निभवीले. पण ते बाळासाहेबांचे वैयक्तिक संबंध होते. बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब होते – हिंदू हृदय सम्राट होते. आता मुलगा पुतण्या धडपडताहेत. त्यांना कसे ही वागवले तरी ते दोघे ही सध्या काकांच्या छत्रछायेखाली. त्यामुळे बीएमसी आणि महाराष्ट्र राज्य दोन्ही जागी आपला म्हणजे राकॉं चा मेयर आणि मुख्यमंत्री राकॉंचा आणण्याचा पुर्ण प्रयास काका करताहेत. सर्व स्तरावर राकॉं आपली सत्ता राकॉं ची आणण्यासाठी करीत आहेत.
कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा ह्या पक्षांना राकॉं पासून सावध राहण्याचा खणखणीत इशारा काकांनी ब्राम्हण संघटनांची मिटींग करुन दिलेला आहे एवढे मात्र निश्चित.

भाई देवघरे

Leave a Reply