बकुळीची फुलं : भाग ३२ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

“त्यांचं” पत्र आलं पोस्टकार्ड वर तीन ओळींची . पहिलं पत्र असंच तीन ओळींचं . “दिल्लीला सुखरूप पोहचलो आणि लवकरच पत्र लिहीन . काळजी नसावी” आताही तीनच ओळींचं पत्र .
“ह्यांना का , तीनच ओळी येतात लिहायला ? कमाल आहे , अशा माणसाशी संसार तरी कसा करावा ?
प्रश्न असले तरी उत्तर नव्हतंच . सप्टेंबर मधे युद्ध संपलं . संपलं तरी ते वारंवार होणार होतंच .
आणि पहिल्या दिवाळीला ते घरी आले . ख-या अर्थांनी दिवाळी साजरी केली . फटाके फोडणं म्हणजे पैसे उडवणं , जाळणं, पैसाव्यर्थ घालवणं हे माझ्या दादांचं मत होतं . आम्हाला चार सुतळी बॉंब , आठ फुलझड्या , नाग होणा-या गोळ्या , रंगीत आगपेटी आणि फुसक्या लवंगी मिरची , असं दिलं जायचं . अर्थात हे सारं ह्यांना माहिती नसल्याने ह्यांनी जाऊन फटाके आणले. आकाश बाण , लक्ष्मी बॉंब , अनार , शिंगाडे आणि किती फटाके , जे आम्ही पाहिलेही नव्हते , नावंही माहित नव्हती . दिवाळी झाली आणि पत्र आलं , ते क्वार्टर मिळाल्याचं .
“ह्यांना” अगोदर जायचं होतं चार्ज घ्यायला. मी नंतर चार दिवसांनी जाणार होते . तिथे कोणी ओळखीचं नव्हतं. की चार दिवस मी थांबू शकेन .
सामान काय एक पोतं . सासूबाई येणार होत्याच महिनाभरांनी .
आई म्हणाली सोबतीला लहान बहिणीला घेऊन जा . मी काही म्हणायच्या आधीच दादा दोघींचं तिकीट घेऊन आले होते .
मी अतिशय आनंदात होते.
सोबत माझी बहिणही येणार होती . त्यावेळी जीवन संदर्भात कुठलेही विचार मनात नव्हते .
आम्ही दिल्लीला पोहचलो . त्यावेळी एका जंगल असलेल्या भागात सिग्नल रेजिमेंट असेल ही चुकूनही कल्पना केली नव्हती . आमचा क्वार्टर म्हणजे एक मोठा हॉल , समोर , साइडला व्हरांडा . आणि खुप मोकळी जागा .
तसा कंच हिरवा निसर्ग . पण क्वार्टर लांब लांब , ओळखी नव्हती . जुजबी सामान होतं . पण स्वयंपाक करावा कशावर , भूश्याची शेगडी नव् ती , स्टोव्ह आणला नव्हता . ह्यांनी बाहेर जाऊन विटा आणल्या , लाकडं आणली आणि सुरू झाला संसार .
झोपायला दोनच खाटा . डिसेंबर मधली दिल्लीची थंडी . दोन ब्लॅंकेट , दोन गाद्या मिळालेल्या .
आम्ही दोघी बहिणी झोपलो . एका खाटेवर ते झोपले .
दर रविवारी मात्र खरी मजा होती . एक सायकल . त्यावर समोरच्या दांड्यावर चादर गुंडाळून बहिण आणि मागे असलेल्या लोखंडी सीटवर चादर ठेवून मी आणि मधे सायकल चालवणारे हे . अशी आमची सवारी पहाटे पासून रात्रीपर्यंत फिरायची .
मग लोधी गार्डन , राष्ट्रपती भवन , इंडिया गेट , बिर्ला मंदिर, कालका मंदिर, आणि असंच फिरत होतो आणि मधले सात दिवस आम्ही दोघी बहिणी दुख-या पायांना तेल लावून शेकत होतो.
पुन्हा रविवारी तोच दूरवरचा प्रवास पण “हे” कधीही कंटाळले नाहीत .. कधी रागावले , दूसरे नाहीत .
पण मला मात्र त्यांच्या शिस्तीचा राग यायचा. तिथली वस्तू तिथेच हवी असायची . ते बोलायचे नाहीत पण कंगवा पडला तर उचलून आरशासमोर ठेवायचे , चांदीची घडी तर असे घालायचे की दुकानातील घडी आहे .
मी देशस्थ आणि बेशिस्त होते असं नाही पण घडी त्याच पद्धतीने का घालावी हा प्रश्न होताच .
खुप प्रश्न असेच शिस्तीचे होते.
महिना काय दीड महिना संपला . बहिणीला सोबत मिळाली आणि ती नागपूर ला परतली , सासूबाई येणार होत्या .
ह्यांनी दुस-या क्वार्टर साठी प्रयत्न केला आणि आनंदनगर ला क्वार्टर मिळाला तिथे एक स्वयंपाक घर एक हॉल मला मोठा आणि दोन बाजूंनी व्हरांडा होता ही कॉलनी होती .दोनच दिवस झाले बहिण गेली तर सामान शिफ्ट करण्यात वेळ गेला . आणि खरच त्याच दिवशी सासूबाई आल्या .
तार आली होती त्यांच्या येण्याची , गेटवर सिक्युरिटी कडे . पण सांगायचं विसरला असावा, गार्ड.
आठ दिवस झाले . ताई खुप मोठ्या हॉलमध्ये एका कोप-यात , तर दुस- या बाजूला आमच्या दोन खाटा , मच्छरदाणी लावलेल्या .
कायम मन धास्तावलेलं . शेवटी ह्यांच्या संयमावर त्यांनीच एक तोडगा काढला .
जातांना त्यांनी माझ्या कंगव्याखाली एक चिठ्ठी ठेवली .
अर्थात हे नंतर कळलं.
” वाचलीत चिठ्ठी ?
” कोणती चिठ्ठी “
“कंगव्याखाली ठेवली होती,वेणीच घातली नाहीस आज ?”
” घातली ना , तुम्ही गेल्यावर आणि आता तुम्ही येण्यापूर्वी .”
“मग चिठ्ठी नव्हती”
“सांगा काय होतं त्यात असं . आणि कागद मोठा असता दिसला नसता का ? “
” मोठा कुठून आणू , बसच्या तिकीटामागे लिहिलं होतं , पेन्सीलनी “
मी खळखळून हसले आणि त्यांना कधी न येणारा राग त्यांच्या गौरवर्णावर प्रगटला
“काय लिहीलं होतं ?”
” सांगून काय फायदा ? आपण तिघांची सिनेमाची तिकीटे काढली होती . ताई मला भाजी घेतांना दिसली . आणि बसशील जायचं तर …”
” हे खरंच बोलता आहात “?
त्यांना काय म्हणायचं ते मला कळत नव्हतं.
ताई आल्या आल्या म्हणाल्या.
“मुकुंदा, कधीची म्हणीन म्हणीन, म्हणते , अरे माझी खाट स्वयंपाक घरात टाक रे, रात्री उठावं लागतं दहा वेळा .ऐकतोस ना ?”
“अगं ताई”
” काम नाही, एक माझं .”
जेवण झालं , ऐसपैस स्व यंपाक घरात ह्यांनी ताईंची खाट घातली , स्वच्छ निळी चादर घातली . ताईंचे पायही दाबून दिले . अमृतांजन जवळ ठेवलं , पाण्याचा तांब्या भांडं ठेवलं .ब्लॅंकेटला चादर लावून दिली
माझ्या मनात आलं, “ताईंनी तर ती चिठ्ठी वाचली नाही “?
पण काहीही असो , दुस-या दिवशी आम्ही तिघं ” खिलौना” पिक्चर बघितला गेलो अतिशय आनंदात.
आता पुढे….

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply