चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे धनी अविनाश पाठक

अनेकदा आपण अनेकांचा चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख करतो. मात्र ते चतुरस्त्र असतीलच असे नाही. अनेकदा उगाचच कुणालातरी चतुरस्त्र म्हणून हरभर्‍याच्या झाडावर चढवले जाते.
असे असले तरी मी मात्र खर्‍या अर्थाने चतुरस्त्र म्हणता येईल एका व्यक्तिच्या संपर्कात गेल्या काही वर्षात आली आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आणि समाजसेवी व्यक्तिमत्व असलेले नागपूरचे अविनाश पाठक.
अविनाश पाठक आणि माझा संबंध भारत विकास परिषद या सामाजिक संघटनेमुळे आला. काही वर्षांपूर्वी भारत विकास परिषदेच्या पश्‍चिम नागपूर शाखेत ते सदस्य म्हणून आले. ते आल्या आल्याच परिषदेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांना पश्‍चिम नागपूर शाखेचे अध्यक्षपद दिले. योगायोगाने त्यावर्षी माझ्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केल्यावर अगदी आठवड्याच्या आतच मला त्यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व लक्षात येऊ लागले.
ज्यावेळी अविनाश पाठकांची माझी ओळख झाली. त्यावेळी ते एक पत्रकार आहेत इतकेच मला माहित होते. भारत विकास परिषदेचे काम सुरु केल्यावर सर्वात आधी लक्षात आला तो त्यांचा व्यापक जनसंपर्क. त्यावेळी भारत विकास परिषदेची पश्‍चिम नागपूर शाखा अगदी मरगळलेल्या अवस्थेत होती. मला सोबत घेऊन अविनाश पाठक कामाला भिडले आणि महिन्याभरात 60 सदस्य नोंदवून मोकळे झाले. शाखेचा पदग्रहण समारंभ करायचा म्हटल्यावर मी गंमतीत एखादा मंत्री बोलवा असे सुचवले. त्यांनी माझ्या समोरच तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना फोन लावला आणि कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले. इतका मोठा मंत्री व्यक्तिगत संपर्कामुळेच यायला तयार झाला हे सांगायला नको.
भारत विकास परिषदेचे काम सुरु केल्यावर दोन तीन दिवसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही भारत विकास परिषदेच्यावतीने गेलो तेव्हा भेटल्याबरोबर गडकरी साहेबांनी अविनाश पाठकांच्या नुकत्याच वाचलेल्या एका पुस्तकाबद्दलच बोलायला सुरुवात केली. त्यावेळी हा माणूस फक्त पत्रकार आहे असे नाही तर लेखकही आहे हे देखील कळले. नंतर माहिती घेतली तेव्हा त्यावेळी अविनाश पाठकांची १० पुस्तके प्रकाशित झाली होती असे कळले. नंतर त्यांची चार पुस्तके नवीन प्रकाशित झाली आणि अजून दोन प्रकाशनाच्या वाटेवरही आहेत.
नेहमी पत्रकारिता करणारे अविनाश पाठक अधूनमधून विविध वृत्तवाहिन्यांवरही राजकीय नेत्यांशी आणि सामाजिक विचारवंतांशी तितक्याच ठाम भूमिकेतून चर्चा करताना दिसायचे. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू या निमित्ताने लक्षात आला. याच काळात अनेकदा स्थानिक कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर ते बोलायलाही जायचे. त्यावेळी हे व्यक्तिमत्व किती उंचीवर गेले आहे हे लक्षात यायचे.
माझ्या संपर्काच्या काळात त्यांच्या अफाट जनसंपर्काचा मला कायम अनुभव आला. कोणत्याही मोठ्या व्यक्तिचे नाव घेतले तरी यांचा संपर्क निघायचाच. भारत विकास परिषदेतर्फे समूहगान स्पर्धेत त्यावेळी नागपूरच्या व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार हे प्रमुख अतिथी म्हणून आले होते. त्यांचे आणि अविनाश पाठकांचे एकेरीतले संबंध पाहून आम्हाला धक्काच बसला. याच कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर हे देखील आले होते. तेही पाठक सरांच्या मैत्रीसाठीच आलो असे स्पष्ट त्यांनी केले होते. भारत विकास परिषदेत सीएए आणि एनआरसी या विषयावर व्याख्यान ठरवायचे होते. डॉ. उदय निरगुडकरांसारखा वक्ता काहीही मानधन न घेता आमच्याकडे व्याख्यान द्यायला आला. त्यांनीही अविनाश पाठकांच्या मैत्रीसाठी मी आलो असल्याचे सांगितले.
सिद्धहस्त पत्रकार, विख्यात लेखक, कुशल संघटक असलेले अविनाश पाठक हे एक संवेदनशील व्यक्तीही आहे. सोबतच्या सर्व सहकार्‍यांची कायम काळजी ते करत असतात. भारत विकास परिषदेचा माझा कार्यकाळ संपल्यावर मी एक समाजसेवी संघटना उभी करून त्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार कसा देता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. सुदैवाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मदतीने एक दोन प्रकल्प नजरेच्या टप्प्यात आले. मात्र हे काम उभे करताना असंख्य अडचणी होत्या. इथे देखील पाठक सरांचीच मदत झाली. त्यात त्यांना काहीही व्यक्तिगत फायदा नव्हता. मात्र श्रृती ही आपली सहकारी आहे म्हणून तिला मदत करणे या शुद्ध हेतूने ते मदत करायला समोर आले होते. अजूनही त्यांची मदत होतेच आहे.
असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असल्यामुळे अविनाश पाठक यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अजूनही त्यांचे नियमित लेखन सुरुच आहे. सध्या ‘पंचनामा’ नामक न्यूज पोर्टलचे ते संपादन करीत आहेत. या उपक्रमात त्यांनी मलाही त्यांची सहकारी म्हणून घेतलेले आहे. इथेही त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचा आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा मला वेळोवेळी अनुभव येतो.
असे चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचे धनी असलेले अविनाश पाठक हे आज २१ मे २०२२ रोजी ६७ वर्षाचे होऊन ६८ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. त्यांना परमेश्‍वराने दीर्घायुरोग्य द्यावे आणि त्याच्या हातून अशीच साहित्य निर्मिती आणि समाजसेवा होत राहावी यासाठी खूप खूप शुभेच्छा.

                                                                                                                                        -श्रृती देशपांडे
                                                                                                                                (सहायक संपादक पंचनामा)

Leave a Reply