विद्यापीठांनी भिन्न विचारधारांसाठी कुस्तीची मैदाने बनू नये – अमित शाह

नवी दिल्ली : २० मे – विद्यापीठांनी भिन्न विचारधारांसाठी कुस्तीची मैदाने बनू नयेत आणि तरुणांनी केवळ त्यांच्या हक्कांसाठी लढण्यापेक्षा कर्तव्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले.
‘रीव्हिजिटिंग दि आयडियाज ऑफ इंडिया फ्रॉम स्वराज टू न्यू इंडिया’ या विषयावर दिल्ली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटनाच्या सत्राला संबोधित करताना शहा बोलत होते.
विद्यापीठे ही मतांच्या आदानप्रदानासाठीचे व्यासपीठ असावीत, विचारधारेच्या संघर्षांची ठिकाणे बनू नयेत. एखादी विशिष्ट विचारसरणी हे कलहाचे कारण असेल, तर ती विचारसरणी नाही आणि भारताची विचारसरणी नक्कीच नाही, असे शहा म्हणाले. विचारसरणी कल्पना व चर्चा यांच्या माध्यमातून प्रगती करते, असेही शहा यांनी नमूद केले.
‘नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे कुणी नष्ट केली, हे कुणालाही आठवत नाही. नालंदा विद्यापीठ अनेक महिने जळत होते असे सांगितले जाते. मात्र या विद्यापीठांमधील विचार आतापर्यंतही जिवंत राहिलेला आहे’, असे शहा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.
आपली देशाबाबतची कर्तव्ये समजून घ्यावीत. हक्कांसाठी लढण्यापेक्षा कर्तव्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला विद्यार्थ्यांना देतानाच शहा यांनी भारताच्या संरक्षण धोरणावरही भाष्य केले.

Leave a Reply