महिला लिपिकाने बँकेला लावला ९७ लाखांचा चुना

नागपूर : २० मे – शहरातील यवतमाळ अर्बन को-ऑप. बँकेतील एका महिला लिपिकाने बँकेची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. लिपिकाने पती व मुलाच्या नावाने खाते उघडून या खात्यात ९७ लाख ६३ हजार ३१३ रुपये वळते केले. हे कृत्य करताना आरोपी महिला लिपिकाने बँकेच्या आयडी पासवर्डचा गैरवापर केला. ही बाब उजेडात आल्यानंतर बँकेचे विभागीय अधिकारी यांनी या आरोपी लिपिकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१३ जानेवारी ते १५ फेबुवारी दरम्यान, बजाजनगर पोलिस ठाणे हद्दीतील यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा देवनगर येथील लिपिक स्नेहा प्रकाश दाणी ऊर्फ स्नेहा तुषार नाईक (वय ३५, फ्लॅट नंबर ३0३, सत्य अपार्टमेंट मनीषनगर, सोमलवाडा) हिने बँकेतून आय.डी. पासवर्डचा गैरवापर केला. तिने बँकेच्या मूळ अभिलेखावर पती तुषार नाईक व मुलगा यांचे खातेधारक म्हणून खाते उघडणी फार्मवर बँॅकेची किंवा व्यवस्थापकांची परवानगी न घेता वेगवेगळय़ा नावाचे खाते उघडले. त्यानंतर वेगवेगळय़ा तारखेला ट्रान्जेक्शन करून पतीच्या खात्यामध्ये एकूण ९७ लाख ६३ हजार ३१३ रुपये वळते करत बँकेची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी बँकेचे विभागीय अधिकारी सतीश श्रीधर जोशी (वय ५७, रा. श्रीनगर अजनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४0९, ४६७, ४७७ (ए), ११४ भादंवि सहकलम ६६ (सी), ६६ (डी) अय.टी. अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply