आनंदवनभुवनी – डॉ. विजय पांढरीपांडे

आता नेदरलँड चे हवामान सुसह्य व्हायला लागलय.या देशातले न चुकविण्यासारखे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गिथोर्न(Giethroon),उत्तर पश्चिमेला असलेलं निसर्गरम्य आगळेवेगळे छोटेसे खेडे गाव.याला watervillageम्हणतात.कारण साधारण तीन हजार वस्तीच्या गावात अठरा,एकोनीसव्या शतकातली नदी कालव्या च्या काठावर वसलेली घरे आहेत.ती एकमेकांना १७६अती पुरातन लाकडी फळ्या नी बांधलेल्या पुलानी जोडली आहेत.गावात रस्ते नाहीत.त्यामुळे दुचाकी चार चाकी वाहने नाहीत!प्रवाशांना आपल्या गाड्या गावाबाहेर ठेऊन पायी चालत प्रवेश करावा लागतो!आत फिरायचे ते पायी किंवा बोटीनेच. किंबहुना ही गाव बोटीने एकसंघ जोडले आहे.या बोटींना पांटर्स म्हणतात.सायकल साठी अरुंद रस्ता आहे ,त्याला बिनेपथ म्हणतात.एकूणच हा देश समुद्र खणून,त्यातील पाणी काढून तयार झालाय.१८-१९ व्यां शतकातील ही घरे कौलारू छपरासारखी निमुळती छप्पर असलेली, निसर्गाचेभान ठेवत , पीट खणून बांधली आहेत. गोट हॉर्न वरून या गावाचे नाव गिथोरन झाले!डच प्रांताच्या ओव्हरिजेल प्रोविंस मधील हे खेडे व्हेनिस ऑफ नेदरलँड म्हणूनही प्रसिध्द आहे.समुद्र खणून काढलेली पीट ही इंधना साठी वापरत पूर्वी.जग आधुनिक झाले तरी या गावातील घरे,त्या घ्रा भोवतीचे कालवे,त्या बोटी,हे सारे पारंपारिक पद्धती ने टिकून आहे.
निसर्ग प्रेमी मंडळी साठी,पक्षी निरीक्षण करणाऱ्या साठी या परिसरातील पायी प्रवास म्हणजे स्वर्गीय पर्वणी म्हटली पाहिजे.एक किंवा दोन तासांचा बोटीतला प्रवास आपल्याला या निसर्गाचे सौंदर्य अधिक जवळून बघायला मदत करतो. ही बोट स्वतःच चालवावी लागते.ते सवयीने सहज जमते.किंबहुना आपण कोणतीही नवी गोष्ट कोणत्याही वयात सहज शिकू शकतो याचा प्रत्यय देणारी असते.हे कालवे अतिशय अरुंद आहेत.त्यामुळे गर्दीच्या वेळी एक बोट दुसरीला धडक देतच पुढे जाते.पाण्यात देखील चक्क ट्रॅफिक जॅम होतो!पण अपघाताची मात्र मुळीच शक्यता नसते.या गावांत अख्खी सुटी घालवायला देखील प्रवासी येतात.शहराच्या गजबजाटा पासून दूर रम्य निसर्गाच्या सानिध्यात माणूस आपल्या साऱ्या वंचना,ताप काही काळ का होईना विसरून जातो.
नेदरलँड हे तुलीप फुलासाठी प्रसिध्द आहे हे वेगळे सांगायला नकोच.ही तुलिप ची लांबच लांब रंगी बेरंगी शेती आपण प्रथम ‘ सिलसिला ‘त पाहिली. सध्या तुलीपबहराचा सीझन सुरू आहे.त्यामुळे कारने जाता येता बरीच खाजगी फॉर्म वर पसरलेली तुलीप ची रंगीन बहार बघता आली.ही तुलीप ची शेती म्हणजे इथले फार मोठे उत्पन्नाचे साधन आहे . ही फुले सर्व जगात निर्यात केली जातात.ती बराच काळ टिकतात देखील.त्यामुळे बुके साठी वापरतात जगभर!फुलदाणी किंवा पुष्प गुच्छ याशिवाय तुळीप चा वेगळा उपयोग नाही.शिवाय ही शेती करणे,जोपासणे, फुलवणे हे देखील फार खर्चिक काम आहे.सारे काही पुनः पुनः नव्याने करावे लागते.तरीही इथली हौशी मंडळी आपल्या घरात देखील पुढे,मागे तूलीप चे कंद लावतात.या फुलांचे विविध रंग, त्यांचे शेड्स हा निसर्गाचा अदभुत चमत्कार म्हंटला पाहिजे.आम्सटरडॅम जवळचे तूलीप गार्डन तर जग प्रसिध्द आहे.
या वीकएनड च्या सहलीत आमच्या बरोबर आणखीन एक कुटुंब होते.त्यातील एका तरुण मुलीशी गप्पा मारताना विशेष मजा आली.बरीच माहिती समजली.हे कुटुंब मूळ कर्नाटकातले.दहा बारावर्षा पासून इथे राहताहेत.नागरिकत्व घेतले आहे.मुळे डच मध्ये शिकली. त्यांची ही एकोणीस वर्षाची मुलगी अंकिता सध्या पदवी(ऑनर्स) चे शिक्षण घेतेय.राज्य शास्त्र, एकोनोमिक्स,राजकीय व्यवस्थापन हे तिचे विषय.ती ज्या विद्यापीठात शिकते तिथून एक डझन नोबेल विजेते तयार झालेत!एकूणच नेदरलँड हा देश आपल्या कुठल्याही राज्यापेक्षा लहान.मुंबई पेक्षा थोडा मोठा.पण येथील दोन तीन विद्यापीठे जागतिक मानांकनात वरचढ आहेत.ही नोबेल विजेत्यांची संख्या ऐकूनच मला धडकी भरली.कारण या बाबतीत आपल्या १३०कोटी लोक संख्ये च्या देशात या बाबतीत आनंदी आनंद आहे! तिला पदवीच्या अभ्याक्रमासाठी देखील संशोधन प्रकल्प करावा लागतो!प्रबंध लिहावा लागतो छोटासा.मी गप्पा करतांना सहज चौकशी केली.ती भारतातील झोपडपट्टी तील व्यवस्थेचा अभ्यास करते आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. त्यांची आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक परिस्थिती चा डेटा ती गोळा करते आहे.या झोपडपट्टी साठी काम करणाऱ्या समाज सेवक पुढाऱ्याशी बोलून,त्याच्या मुलाखती घेऊन त्यावर विश्लेषण करून तार्किक पद्धती ने निर्णया पर्यंत पोहोचणे हे तिच्या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे.मला तिची समज,तिचे विचार,तिचे तर्क, या साऱ्याचे कौतुक वाटले.त्यात आत्मविश्वास जाणवला.अंकिता विद्यापीठात गेल्या पासूनच बारावी नंतर स्वतंत्र राहते.स्वतःच्या पायावर उभी आहे.पालकांवर अवलंबून नाही!भारतातील प्रोजेक्ट साठी माहिती मिळवण्यासाठी तिला तिच्या आजोबांनी मदत केली तेव्हढीच. ती सुध्दाठराविक व्यक्ती शीसंपर्क साधून देण्या पुरती.बाकी सर्व तिने स्वतःच प्लॅन केले.तिचा लहान भाऊ अन् सोबतीने आमच्या दोघी नाती इथे संस्कृत श्लोक शिकतात.आमच्या सात वर्षाच्या नातीला विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे.उच्चार स्पष्ट अचूक आहेत.आपल्याकडे काही जणांना परदेशी मुलांना नवे ठेवण्याची सवय आहे.अपुऱ्या माहिती च्या आधारावर सरसकट निष्कर्ष काढणे योग्य नसते. अन् उडदा माजी काळे गोरे सगळीकडेच असतात.म्हणूनच दुसरी बाजू समजून घेणे गरजेचे असते.या सहलीत ही दुसरी बाजू बघायला मिळाली.

डॉ. विजय पांढरीपांडे

Leave a Reply