आमच्या लेखी संजय राऊत हा फार महत्त्वाचा माणूस नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई : १९ मे – संजय राऊत हे रोजच टीका करत असतात. आम्ही त्यांना फार महत्त्व देत नाही. आमच्या लेखी संजय राऊत हा फार महत्त्वाचा माणूस नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. संजय राऊत यांनी ज्ञानवापी मशीद आणि राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्यासंदर्भात टीकेचा सूर लावला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी संजय राऊत यांची दखल घेणेही टाळले. संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांवर मी का उत्तरं देऊ? ते एवढे मोठे कोण लागून गेले आहेत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, ते पाहावे लागेल.

देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, मला वाटतं की, आम्ही यासंदर्भात राजकीय परिणामांचा विचार करत नाही. हा विषय आस्थेचा आहे. आस्थेचे विषय हे राजकारणापलीकडे असतात. न्यायालय हे विषय सोडवत आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता न्यायालय काय निर्णय देते, ते पाहावे लागेल. पण औरंगजेबाने अशाप्रकारे मंदिरं तोडली होती, ही गोष्ट खरी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
ज्ञानवापी मशिदीवरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे. या वादावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. ‘भाजपकडून या माध्यमातून २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. दंगली पेटवून निवडणुका लढवणं दोन्ही बाजूंनी टाळायला हवं,’ असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनाही लक्ष्य केले. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी आधी उत्तर भारतीयांना विरोध करत मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आता त्यांनी भूमिका का बदलली हे मला माहीत नाही. ते एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला निघाले,’ असे संजय राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply