हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला रामराम, काँग्रेसच्या सर्व पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

नवी दिल्ली : १८ मे – अवघ्या काही दिवसांपूर्वीच पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सहा महिन्यांवर राज्य विधानसभेच्या निवडणुका आलेल्या असतानाच पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा असलेले युवा नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाला रामराम केला आहे. यासंदर्भात ट्वीट करून हार्दिक पटेल यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर गुजरातमधील मतांची गणितं जुळवण्याचं आव्हान असणार आहे.
यासंदर्भात हार्दिक पटेल यांनी ट्वीट केलं असून त्यात त्यांनी पाठवलेलं पत्र देखील शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये हार्दिक पटेल यांनी भविष्यात गुजरातसाठी सकारात्मकपणे काम करणार असल्याचं सांगत नव्या राजकीय वाटचालीचे देखील संकेत दिले आहेत.
हार्दिक पटेल यांनी ट्वीटमध्ये शेअर केलेल्या पत्रासोबत एक संदेश पोस्ट केला आहे. यात, “आज मी हिंमत करून काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचं माझे सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मी असं मानतो की माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी खरंच सकारात्मक पद्धतीने काम करू शकेन”, असं त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. असाच काहीसा प्रकार आसामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते हेमंत बिस्व सरमा यांच्याबाबत घडला होता. हेमंत बिस्व सरमाही एकदा राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा सरमा हे राहुल गांधी यांच्यासमोर आपल्या समस्या पोटतिडकीने मांडत होते. मात्र, त्यावेळी राहुल गांधी आपल्या ‘पीडी’ या कुत्र्याला बिस्किटं भरवण्यात मग्न होते. त्यांनी सरमा यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. एवढेच नव्हे तर राहुल गांधी ज्या प्लेटमधून कुत्र्याला बिस्कीटं भरवत होते, त्याच प्लेटमधून उचलून काँग्रेसचे काही नेते बिस्कीट खात होते, असा दावाही सरमा यांनी केला होता. या प्रकरामुळे अपमानित झालेल्या हेमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राहुल गांधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा हाच मुद्दा हार्दिक पटेल यांनी अधोरेखित केला आहे. मी जेव्हा जेव्हा गुजरातच्या समस्या घेऊन राहुल गांधी यांनी भेटलो पक्षाच्या नेतृत्त्वाला आमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा मोबाईल पाहण्यातच जास्त रस असायचा. काँग्रेसची सत्ता आकुंचन पावून दोन राज्यांपुरतीच उरली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे. गुजरातसह अनेक राज्य येत्या वर्षभरात विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहेत. अशावेळी हार्दिक पटेल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे काँग्रेसला पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याच वेळ आली आहे.

Leave a Reply