रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी करणारा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात

नागपूर : १८ मे – रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी करणारा दहशतवादी रईस अहमद शेख असादउल्ला शेख (वय २८, रा. अवंतीपुरा) याला नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. एटीएसकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत असून त्याच्या नागपुरातील हस्तकाबाबतही माहिती घेण्यात येत आहे. ‘गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पाकव्याप्त काश्मीरातील कमांडर ओमर यानेच रेकी करायला सांगितली होती’, असे रईस हा सांगत आहे.
ओमरच्या संपर्कात आल्यानंतर त्याने आपल्याला (रईसला) नागपुरातील महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार, १३ जुलैला रईस हा विमानाने काश्मीरहून मुंबईला आला. तेथून विमानाने नागपुरात आला. त्याने नागपुरातील हस्तकाशी संपर्क साधला. परंतु, त्याचा संपर्क झाला नाही. त्यानंतर तो ऑटोरिक्षाने सीताबर्डी येथे आला. येथील एका हॉटेलमध्ये थांबला. १४ जुलैला तो आधी महालमधील संघाच्या मुख्यालयाची रेकी करायला गेला. परंतु, त्याला रेकी करता आली नाही.
त्यानंतर तो रेशीमबाग मैदानात आला. येथून त्याने मोबाइलद्वारे स्मृती मंदिराचे चित्रीकरण केले. ही चित्रफित त्याने व्हॉट्सअॅपद्वारे ओमरला पाठवली. मात्र, ती स्पष्ट नसल्याने ओमरने त्याला पुन्हा चित्रीकरण करून चित्रफित पाठवण्याची सूचना केली. त्याने पुन्हा चित्रीकरण करण्यास सुरुवात केली असता दरम्यान पोलिस दिसल्याने त्याने चित्रीकरण केले नाही. ‘इंटरनेटचा डाटा संपला’, असे त्याने ओमरला सांगितले व मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ केला. १५ जुलै रोजी सकाळी तो नागपूर-दिल्ली मार्गे विमानाने काश्मीरला गेला. दरम्यान, जानेवारी महिन्यात काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली. नागपुरातील स्मृती मंदिराची रेकी करण्यात आल्याचा खुलासा यावेळी झाला. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी रईसविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. नुकताच दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी काश्मीरला गेले. त्याला नागपुरात आणले. एटीएस त्याची कसून चौकशी करीत आहे. ओमरचेच तो नाव घेत आहे, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply