मालमत्तेच्या वादातून लहान भावाने केला मोठ्याचा खून

यवतमाळ : १८ मे – दोन भावांतील मालमत्तेचा वाद विकोपाला पोहोचला. लहान भावाने काहीही न कळू देता, अचानक मोठय़ा भावावर चाकूने हल्ला केला. कुटुंबीयांसमक्षच स्वत:च्या सख्ख्या भावाला चाकूने भोसकून जागेवरच ठार केले. ही घटना सकाळी १0 वाजेदरम्यान माळीपुरा परिसरात घडली. राहुल मनोहरराव बाचलकर (३६), असे मृताचे नाव आहे.
राहुल हा हारविक्रीचा व्यवसाय करीत होता. शहरातील मध्यभागी येत असलेल्या टांका चौक येथे राहुलचे व फूल व हार विक्रीचे दुकान आहे. त्यामुळे तो अनेकांना परिचित आहे. त्याचा लहान भाऊ सतीश (३२) हासुद्धा फूल विक्रीचाच व्यवसाय करतो. त्याने हिस्सेवाटणीवरून वाद घालत मंगळवारी सकाळी स्वत:च्या भावाच्या पोटात चाकूने सपासप वार केले. घरासमोरच राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला. या घटनेने माळीपुरा परिसरात एकच खळबळ उडाली. बाचलकर कुटुंबीय अक्षरश: हादरून गेले. काय करावे कुणाला सुचत नव्हते. निपचित पडलेल्या राहुलला तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यावेळी राहुलची पत्नी व आई प्रचंड आक्रोश करू लागल्या. शहर पोलिसांनी तत्काळ गुन्ह्यातील संशयित सतीश बाचलकर याला ताब्यात घेतले. याप्रकरणी राहुलची पत्नी रिता यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply