मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

आयुष्याचे शेवटचे पान….

“आयुष्याचे पान शेवटचे, दुःखाचे का असावे, तुटलेल्या काळजाला ह्या तोडूनी का जाते, संपते ही कधी ना कधी आयुष्याची वाट, मग आयुष्याचे शेवटचे पान, आसवांनीच का भिजून जाते”
आपल्याला आयुष्य हे जगतांना काही ना काही शिकवत असत. आपल्याला कितीही आनंद मिळाला तरी आयुष्यात असा क्षण येतो त्यावेळी आपण निराश होतो. निराशेच्या खाईत ढकलल्या जातो. ज्या मुलांसाठी आई वडील खस्ता खातात, काबाड कष्ट करतात, तिच मुलं त्यांना का सोडून जातात. संसारातले सगळे कर्तव्य पार पडल्यानंतर त्यांच्या नशिबी दुःख का येतं. त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर दुःखाच्या सुरकुत्या का येतात, आयुष्याचा रस्ता पार करतांना त्यांच्या मार्गात शेवटच्या वळणावर आनंदाची उधळण देण्यापेक्षा त्यांना दुःखाचे दिवस त्यांची मुलं का दाखवतात?. “असे दिवस येण्याअगोदर आम्हाला मरण का आलं नाही हे त्यांच्या मनात येणं साहजिकच आहे”. त्यांना काय हवं दोन शब्द प्रेमाचे, त्यांच्यापासून दुरावलेल्या प्रेमाच्या नात्यात त्यांना म्हातारपणाची नात्यांची काठी म्हणून आधार हवा असतो.
आपण जन्माला का आलो याचं उत्तर ज्या क्षणी तुम्हाला कळेल त्यावेळी तुम्हाला जाणवेल कि खरंच तुमचा मनुष्यजन्म हा लायक आहे का? आज प्रत्येकाने हा विचार मनाशी ठरवला तर मला नाही वाटत की, ज्या घरात आपले म्हातारे माय-बाप त्यांना त्यांची मुले त्यांचा आदर करेल. तुम्ही स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा आणि स्वतःला विचारा की आपण जे त्यांच्यासोबत वागत आहे उद्या जर आपली मुलं आपल्याशी अशी वागली तर? ही भीती जेव्हा तुमच्या मनाला स्पर्शून जाईल त्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की, आपल्या माय बापाला एक प्रेमाचा आलिंगन देऊन त्याच्या कुशीत शिरून त्यांची माफी मागावी. हे करताना तुम्हाला एक आंतरिक समाधान मिळेल आणि केलेल्या कृत्याचा पश्चाताप होईल यात वाद नाही. माझ्या सांगण्याचा मतितार्थ हा वेगळा आहे. पन्नाशीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या कलेचा मार्ग अवलंबायला हवा. कारण निवृत्तीनंतर जो वेळ असतो तो खूप भयानक असतो. कारण आपलं अर्धशतक
आटपलेल असतं. आपल्या कुटुंबात पुढे काय चालले आहे, कोण कोणाशी असे वागत आहे, याकडे थोडा थोडा काढता पाय घ्यावा, जर रिकाम्या वेळेची ही पोकळी भरून काढायचा मार्ग म्हणजे आपला छंद. हा छंद जोपासा. छंद जोपासायचे विविध मार्ग आहे. उदाहरणार्थ पुस्तक वाचणे, लिहिणे, चित्र काढणे ,एखादी ज्ञानेश्वरी,गीता वाचणे असे कितीतरी मार्ग आहेत.
मला असं वाटतं या वयात तुम्ही शिकण्याकडे कल वाढवावा. कारण तुम्ही शिकत राहिलात तर तुमचा मेंदू हा कार्य करण्यात व्यस्त राहतो.याने काय होईल तुमचे विस्मरण कमी होईल. तुम्ही व्यस्त राहाल. सर्व कलांमध्ये एक समान गुण असतो तल्लीनता कारण माणसाचे मन एका ठिकाणी स्थिर बसत नाही तर ही कला तुम्हाला एका ठिकाणी बसून ठेवते.शिकायला वयाचं बंधन नसतं. कोणत्याही वयात माणूस शिकू शकतो. अरे, आवड असली की कोणतीही कला आत्मसात करता येते.
तुम्ही तुमच्या कलेशी मैत्री करून बघा कारण कलेशी केलेली मैत्री तुम्ही कसं जगायचं हे शिकवते.
आजकालच्या तरुण पिढी मध्ये कुठलीही गोष्ट मला पटकन मिळाली पाहिजे हेचहीच स्पर्धा दिसून येते. या स्पर्धेच्या मागे धावता-धावता तुम्ही हेही विसरतात की कुठलीही गोष्ट ही सहजासहजी लवकर मिळत नाही.त्यांचे पालक त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला काही सांगत असतात. त्याचा तुम्हाला राग येतो. त्यांचा राग मानू नका, कारण त्यांच्या शब्दात राग नाही तर ते काळजीपोटी सांगत असतात. कारण तुम्ही जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यांना तुमच्या कडून काही नको आहे. त्यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडली आहे आता तुमचे काम आहे त्यांना सुखात ठेवणे.
आज तरुण पिढीने कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी ती ही की, आपल्या आयुष्यात नेहमी काही गोष्टींना थारा देऊ नका, स्वार्थ,मोठेपणा, ‘ स्व ‘ पणा, अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना, या गोष्टी दूर ठेवल्या तर तुम्हाला आनंद देता येईल व आनंद घेता पण येईल.पण आणि या गोष्टींमुळे नाती दुरावतात यावर एकच तोडगा सगळं विसरा आणि समोरच्याला माफ करा.
आपले उरलेले आयुष्य हे समाधानात जावे असे प्रत्येकाला वाटत असतं. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर सगळं आयुष्य सुखात आनंदात जाईल.
आपला उत्तरार्ध हा सुखाचा जावा ही माझी माफक अपेक्षा. आनंदाने सुखाने नियोजनपूर्वक येणारे आयुष्य घालवा.
“नाही देता आलं धन तरी
देता यावा निर्मळ आनंद
आपल आयुष्य अमूल्य समजून
फूलवत जावा हास्य सारं”

पल्लवी उधोजी

Leave a Reply