आनंदवनभुवनी – डॉ. विजय पांढरीपांडे

नातीने शिकवला धडा

यावर्षी नातीच्या वाढदिवसाला आम्ही नेदरलँडला हजर असल्याने ती खुश होती.तिच्या वाढदिवसाची तयारी करताना,तिच्या बरोबर गप्पा मारताना मजा येत होती. बोलतांना मी एखादी गोष्ट न आवडल्याचे सांगितले, तर तिचे उत्तर असायचे , that’s your problem, तो तुमचा प्रश्न आहे.भारतात असे करत नाहीत, चालत नाही असे म्हंटले तर तिचे तेच उत्तर ठरलेले,it’s their problem, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..मला काय त्याचे?वरवर पाहिले तर तिचे म्हणणे उद्धट पणाचे वाटेल. तिरसट पणाचे वाटेल.पण खोल विचार करता मला तिचे म्हणणे पटले.त्या मागचे तत्व भावले.
एरवी आपण स्पष्ट बोलायला घाबरतो.आपले बोटचेपे धोरण असते नेहमी.आपल्यालानकार देणे जड जाते.इकडे युरोप मध्ये स्पष्टवक्ते पणा जाणवतो.आत एक बाहेर दुसरे असे काही नसते.जे आहे ते रोखठोक.नात बोलली तसे!काय म्हणायचे होते तिला?तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही तर ती तुमची समस्या.मी माझ्या आयुष्याची चौकट तुम्ही आखून दिलेल्या फ्रेम मध्ये का बसवू? उलट आपल्या कडे हा आग्रह असतो.मुलांनी आमच्या धाकात राहिले पाहिजे.आम्ही म्हणू तेच ऐकले पाहिजे.म्हणजे मुले वाढली,मोठी झाली तरी त्यांच्या निर्णय क्षमतेवर आपला विश्वास नसतो.किंबहुना आपण त्यांना स्वतंत्र विचार करूच देत नाही.वीस वर्षाचा घोडा देखील आई बापासाठी बबड्याच असतो!
मला काही दिवसापूर्वी याच नाती शी फोनवर झालेले संभाषण आठवले. ती म्हणाली होती,”ड्याडी तुम्ही मला advise, उपदेश करीत जा.तुमचा अनुभव दांडगा आहे.पण त्यातले काय घ्यायचे अन् काय नाही हे मी ठरवेन.कारण सगळेच माझ्या फायद्याचे असेल असे नाही.तिथली परिस्थिती वेगळी.इथले वातावरण वेगळे.मला काय योग्य ते मी माझा विचार करून ठरवेन!”मला तिच्या स्पष्टोक्ती चे कौतुक वाटले. वयात येणाऱ्या नातीचा आत्मविश्वास दांडगा होता हे खरे.
ही स्पष्टोक्ती पाश्चात्य व्यवहारात नेहमीच जाणवते.आमचे हैदराबाद चे शेजारी मित्र अमेरिकेला मुलाकडे गेले होते.त्यावेळचा त्यांनीच सांगितलेला किस्सा..तिथे गेल्यावर सवयी प्रमाणे त्यांनी बायकोला पाणी मागितले. ती पाणी द्यायला उठणार तोच त्याच्या अमेरिकन सुनेने त्यांना थांबवले.ती सासूला म्हणाली,”आई,कधी बाबांनी तुम्हाला पाणी आणून दिले का?तुम्ही त्यांना कधी पाणी मागितले का?त्यांना तहान लागलीय तर ते घेतील पाणी.”आमच्या मित्रांनी स्वतः उठून पाणी घेतले हे सांगणे न लगे!हा विचार अन् नातीचा विचार यामागचे तत्व एकच होते.प्रत्येकाने आपापले बघावे. आपली तहान आपणच भागवावी.दुसऱ्यावर अवलंबून राहू नये!समता बंधुभाव वगैरे आपल्या कडे संविधाना पुरते!प्रत्यक्ष व्यवहारात आपली वागणूक वेगळी असते.इकडच्या मुलांनी वडिलांना नमस्कार केला नाही तर आपण bad manners म्हणून मोकळे होतो.नमस्कार केला तर पहा किती चांगले संस्कार असे कौतुक करतो.पण आपल्याकडे तोंड देखला नमस्कार करणारी मुले पाठीमागे वाटेल ते बोलतात,प्रसंगी शिव्या घालतात,हे कटू सत्य आपण सोयीस्कर पणे विसरतो.या पार्श्वभूमीवर नातीच्या बोलण्यातला खरेपणा जाणवतो.
हा मोकळेपणा युरोपियन संस्कृतीत प्रामुख्याने जाणवतो.मुलाकडून, सूनेकडून समजले,कॉलेजची मुले प्रोफेसराना पहिल्या नावानेच हाक मारतात.त्याआधी मिस्टर,मिसेस वगैरे काही नाही.याला इकडे उध्दटपणा समजत नाहीत.(कॉलेज मध्ये तर वर्ग चालू असताना मुले ब्रेकफास्ट, लंच देखील खातात.हे जरा अती होतय असं आपण म्हणू शकतो).
एकमेकांच्या संबंधात परस्परांवर वर्चस्व गाजवण्याची आपल्याला हौस,सवय असते.मग ते नवरा बायको चे नाते असो की सासू सुनेचे..किंवा मुलाशी आई वडिलांचे.या वर्चस्वाचा दुसऱ्याला त्रास होतोय याची देखील आपण पर्वा करीत नाही.त्यामुळे अनेक नात्यात प्रेम, लळा जिव्हाळा राहिला दूर,एक प्रकारचं कडवट पण निर्माण होतं. त्यामुळे आज साठ वर्षाची असलेली स्त्री वीस तीस वर्षांपूर्वी सासूने केलेल्या छलाचे, नंणदानी मारलेल्या टोमण्याचे कोळसे उगाळत बसते! संसारातील समस्याचे मूळ देखील या वागण्यातच असते.आपले वागणे सासूला पटले नाही तर,it’s her problem, हा तिचा प्रश्नआहे ,मला माझ्या पद्धतीने संसार करायचा आहे,असे स्पष्ट सांगण्याची हिंमत नव्हती आपल्या कडे.आता काळ बदलला आहे हे खरे. पण तो खरच बदलला आहे का हा देखील प्रश्न उरतोच.घरातील मुलाची आई आणि बायको याच्यातले ताण तणाव,लहान मुले अन् पालक याच्यातले संघर्ष,नोकरीच्या ठिकाणी बॉस किंवा कलिगयाच्यातले तणाव,हे सारे मलाच सारे समजते,मीच खरा,माझेच बरोबर या एका तत्वा भोवती फिरणारे असते.प्रत्येकाला आापल्या मनासारखे व्हावे,इतरांनी वागावे असे वाटते.नात जसे म्हणाली,की तो त्यांचा प्रश्न आहे,ते त्यांचे विचार आहेत,मी कशाला माझे आयुष्य त्याच्या दावणीला बांधू? माझ्या आयुष्यावर माझ्या विचाराचे,माझ्या कृतीचे नियंत्रण असले पाहिजे.मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार.मी दुसऱ्याचे ऐकेन. पण वागेन आपल्या मनाप्रमाणे.म्हणजे माझ्या बऱ्या वाईट कृतीची जबाबदारी देखील माझीच असेल.या वागण्यात रिस्क असेल.असेना का..रिस्क कुठे नसते?पण माझ्या आयुष्याच्या गाडी चे चूक माझ्याच हाती हवे.माझा मार्ग मी शोधेन.त्या वाटा वळणावरील खाच खळगे कसे पार करायचे हे माझे मीच ठरवेन.मी माझ्या पतंगाची दोरी दुसऱ्या कुणाच्या हातात देणार नाही.हेच तत्व या छोट्या नातीच्या बोलण्यातून ध्वनित होत होते.गेल्या आठवड्यात याच नातीने पुढाकार घेऊन ,स्वतः बनवलेल्या वस्तू विकून संपूर्ण शाळे तर्फे कितीतरी हजर युरो युक्रेनच्या मुलासाठी मदत म्हणून जमवले!युक्रेन साठीच का,असे विचारले तर तिचे उत्तर तयार होते, नेदरलँड हा देश युक्रेन च्याबाजूने उभा आहे म्हणून!तिच्याशी बोलताना,गप्पा मारताना,वाद घालताना कधी कधी वाटते.. आपण educated illiterate सुशिक्षित अज्ञानी असतो का कधी कधी? तसेच असावे..कारण नातीचा धडा खूप काही शिकवून गेला एव्हढे मात्र खरे!

डॉ. विजय पांढरीपांडे

Leave a Reply