सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मला पाहा नी फुलं वाहा !

नोव्हेंबर २०१९ मविआ सरकार अस्तित्वात आले नी कालचे उद्धव साहेबांचे भाषण बघितल्यावर प्रकर्षाने जाणवले की ही तर महाराष्ट्र अध:पतनाची सलग अडीच वर्षे.ज्या वेळी कर्तृत्व शून्य असते. बोलायची सोय नसते पण बीएमसी निवडणुका तोंडावर आल्यात, मतदार हातातून निसटायला लागले, एक महत्वाचा स्त्रोत हातातून जाण्याची शक्यता झाली. बीएमसी हातातून गेली, आर्थिक स्त्रोत बंद झाला तर पुढे काय? ही विवंचना जागृत झाली आणि मातोश्री मध्ये दोन दोन पक्षांचा पट्टा बांधलेला हा सर्वस्व लुटलेला (भ्रष्टाचाराचे आरोप घरापर्यंत पोचले. ह्या सरकारने केतकी चितळेला अटक केली. पण किरीट सोमय्या दिवसरात्र मविआ सरकारवर आरोप करताहेत. मात्र मविआ सरकार अटक करु शकत नाही सोमय्या ला. म्हणून “सर्वस्व लुटलेला” हा शब्दप्रयोग केला आहे) स्वतः ला ढाण्या वाघाची उपमा देणारा मुख्यमंत्री मैदानात उतरला. कोर्टाने निवडणूका घेण्याचे आदेश दिला आणि राज्यसभेतून रिकामा झालेला संजय राऊत ने बाह्या सरसावल्या आणि पोस्ट टाकली –
लगता है फिरसे उतरना
पडेगा मैदान मे दुबारा:
कुछ लोग भूल गये है..
अंदाज हमारा !!!
जय महाराष्ट्र !
आज क्रांतिकारी दिवस !!

राऊत साहेबांचा अंदाज जबरदस्त ३० वर्षे पत्रकारितेची पक्षाध्यक्षाचा गवगवा कसा करायचा! सभेला यशस्वी कसे करायचे! जनमानसात उत्सुकता जागृत करून टीव्ही वर TRP कसा जागवायचा! ह्या सर्व गोष्टीत निष्णात राऊतांनी सभेचा जागर गर्जवला. आणि अक्षरशः महाराष्ट्र आणि देशभराच्या कोट्यवधी जनतेला भाषण बघण्यास बाध्य केले. आदेश बांदेकर चे सुत्र संचालन तर काय सांगावे! देशभराच्या प्रत्येक स्त्री च्या मनात घर करुन बसलेला आदेश तर दुग्धशर्करा योग.
साहेब मंचावर आले तो पावित्रा ती देहबोली ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मंचावर भगवी शाल पांघरून यायचे, गळ्यात रुद्राक्षांची माळ, वरच्या खर्जातील मर्मभेदी आवाज. दोन्ही हात पसरून वर करायचे त्यावेळी जाणवायचे की एक हिंदू नेता हिंदू जनांना तारायला मंचावर आला आहे. त्यांचा तो पेहराव, रुतबा, हिंदुत्वाशी इमान, भेदक नजर एका डरकाळीनिशी पाकिस्तान मध्ये बसलेल्या भल्याभल्या राजकारण्यांचे लांडे पायजामे ओले करत असत. “बंदा, बंबई के बाहर निकलता नही है, पर खौफ तो देखो!” पाकिस्तानी मिडीयावर बाळासाहेबांचे चर्चे चालत. पण रोड झालेले पेहरावातील भगवे वस्त्र नदारद झालेला कुर्ता पायजमा घातलेले उद्धव साहेबांनी हात पसरले वर केले, त्यांना वाटले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आविर्भावात हात वरती केले तर लोकांना बाळासाहेब मिळाल्याचा दिलासा मिळेल! झाले उलटेच आज त्यांचा कुर्ता देखील भगवा नव्हता. कपाळाला टिळा तर लावणे भाग होते. इथे साहेबांमध्ये दूर दूर तक बाळासाहेबांची छबी दिसली नाही. ह्यापेक्षा राज ठाकरे ह्यांनी भगवी शाल पांघरून, कपाळाला टिळा आरती केली होती, त्यामध्ये राज ठाकरे बऱ्याच अंशी स्वतः ला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या Look च्या जवळ पोचल्याचे देहबोलीतून वाटले. दोघांनी किती ही वठवलं तरी हे नाटकंच्. दोघांमध्येही दम नाही हिंदू हृदय सम्राटांच्या नखाची धुळ नाही. गंमत म्हणजे एका घराण्याचे दोन भाऊ एक होवून “शिवसेनेसारखा” एक पक्ष चालवू शकत नाही. तर ही भावंडे एक होवून महाराष्ट्र कसा चालवणार? दोघेही सध्या राजकारणात जम बसविण्यासाठी पुरजोर कोशिश करताहेत, हिंदुत्ववादी तत्वांशी तडजोड करताहेत. कधी भाजपाच्या तर कधी राकॉं च्या डफलीवर ताल धरताहेत. एकाने तर मुख्यमंत्री पदासाठी आपली सांस्कृतिक धरोहर पणाला लावली. तर एक जण लाव रे तो व्हिडिओ पासून सुरु केलेली यात्रा पुन्हा हिंदू मुद्द्यांवर उचलून धरली. वाट बघताहेत राज कुठे काही अजुन सिटा वाढल्या तर सत्तेत संधी मिळते का? थोडे से अवलोकन केले तर ह्या सर्व गोष्टी लक्षात येतात. दोघांना दौडवणारी शक्ती कोणती? ते देखील लक्षात येते.पण सारासार विचार न करता ही साधी गोष्ट भेज्यात शिरत नाही. हा आपल्या मतदारांच्या भेज्यातील केमिकल लोचा आहे.
भाषण सुरू करताना शिवशाही परंपरेनुसार पुकारा करण्यात आला. उद्धव साहेबांना ह्या पुकाऱ्यावर पाचारण करण्यात आले त्यावेळेस च् लक्षात आले की आज पक्षप्रमुख बोलणार, आज मुख्यमंत्री पदाचे भाषण नाही. कारण महाराष्ट्राच्या संविधानात कोठे ही असा पुकारा करण्याचा कायदा नाही. गंमत आहे. हा मुख्यमंत्री सुद्धा साक्षात्कार (इंटरव्ह्यू) देतात पण निवडक पत्रकारांना. जसे ह्यांचा नी संजय राऊतांचा गाजलेला साक्षात्कार. ज्याची सर्व सोशल माध्यमांनी सार्वजनिक चिरफाड केली होती.
साहेबांच्या भाषणाचे प्रयोजन हे बीएमसी निवडणुका साठी होते. अडीच वर्षात जी काही हानी झालेली ती भरून काढण्यासाठी घेतलेला साऱ्या सभांचा बाप असणारी सभा.
उद्धव साहेबांनी खुप मुद्दे उचलले. पहिले तर आदेश बांदेकरांनी सांगितले की ३२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. २ लाख रुपयांची. ही मात्र सर्व जगतासाठी बातमी होती. आजपर्यंत कुठे ही न झळकलेली बातमी. ही बाब खरंच् कौतुकास्पद आहे. ठाकरे सरकारनी जर ३२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असेल तर ठाकरे सरकार वंदनीय आहे. ऐतिहासिक निर्णय आणि तो आजपर्यंत बाहेर आला नाही ह्याचे आश्चर्य वाटते. कुठल्याही वर्तमान पत्रात, मिडिया मध्ये ही बातमी आली नाही. जे उद्धवसाहेब म्हणाले, आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही काम करतो, गाजावाजा करत नाही. ही गोष्ट ठाकरे परिवाराने करून दाखवले असे म्हणावे लागेल. इतका प्रचंड पैसा कसा आणि कुठून आला! उभा केल्या गेला, कोणाच्या खात्यात गेला? हे प्रश्न साहजिकच मनात उभे राहतात. (३२लाख x २ लाख = जमतोय गुणाकार? साहेबांप्रमाणे २० हजार कोटींची कर्जमाफी, साहेबांनी सात बारा कोरा केला असे म्हणाले) इतका प्रचंड पैसा आला कसा? गेला असा? गेला कुठे? ती बॅंक खाती कुणाची? हे प्रश्न साहजिकच उभे राहतात. ह्या एका वाक्यावर गदारोळ उठून ईडी परत धाड न पडो म्हणजे पावले म्हणायचे.
ही अडीच वर्षे म्हणाल तर आरोप प्रत्यारोपांची अडीच वर्षे म्हणायला हरकत. दोन लहान मुल जेव्हा भांडतात ती कशी! एक दुसऱ्याला म्हणतो “तू मुर्ख आहे!” दुसरा उत्तर देतो, “तूच्च आहेस” मग पहिला म्हणतो “तू महामुर्ख आहे” त्याला उत्तर येते “तू अतिमुर्ख आहेस!” मग “तू महाअतिमुर्ख आहेस!” त्याला उत्तर,” तू महाअतिअतिमुर्ख आहेस” …….. आणि हा प्रकार सतत अडीच वर्षे सुरू आहे. गंमत म्हणण्यापेक्षा वाईट वाटते की ह्यामध्ये भाजपा पक्षाचे नेते देखील हिरीरीने नको ते बरळत असतात. “सरकार जून मध्ये पडणार” “सरकार दोन महिन्यांत पडणार” ” करेक्ट कार्यक्रम केव्हा पाडायची? माझ्यावर सोडा” अरे! जनतेला तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय? की आम्ही सरकार अस्थिर करायच्या प्रयत्नात आहे पण पडत नाही. बाप्पेहो! तुम्ही केलेल्या युतीच्या चुकेनी राकॉं, कॉंग्रेस ला चुकुन मिळालेले सरकार कोणी सुखा सुखी सोडेल का हो? एवढी सोपी गोष्ट सामान्य जनतेला कळते पण भाजपा वाले आपले दिवा स्वप्न बघण्यात गुंग. भाजपा विसरू नका, सामान्य जनतेचा कौल तुमच्या बाजूला होता पण ताटाखाली शिजलेल्या विश्वासघातकी राजकारणाचा मागमुस तुम्हाला लागु नये ह्यात तुमच्या राजकीय प्रगल्भतेचा कस लागतो आणि कळते संजय राऊत जेव्हा म्हणतात की साहेबांना समजायला शंभर वर्षे लागतील! असे का म्हणाले होते.
मुख्यमंत्री साहेबांनी सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. आणि भाषणाला सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युची हकिकत ऐकली तरी अंगावर शहारे येतात. हिंदू रग रग मेरा परिचय काय हे आम्हाला ऐकता ऐकता डोळ्यात पाणी येते. ३९ दिवस बंदिस्त हाल अपेष्टांचे! आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा नामर्द औरंग्याच्या हाती लागण्याइतपत लेचापेचा होता? नाही! घरातील लोकं फितुर झाले की वाघाचा छावा देखील हतबल होतो. घरातून फितूरी झाली आणि छत्रपती संभाजी राजे औरंग्याच्या हाती लागले. मग सुरू झाला त्यांना मुसलमान करण्यासाठी रोज शरीराची प्रताडना करण्यात आली. अन्नपाण्या विना ठेवण्यात आले, डोळे फोडण्यात आले, कातडी सोलण्यात आली, एक नख काढण्यात आले आणि रोज त्यांना मुसलमान झालात तर सुटका बिदागी ची आमिषं बहाल करण्यात आली. वाचक मित्रांनो! विचार करा, थोडासा जीव नकोसा झाला तरी आपण परिस्थिती शी तडजोड करणार. पण अशा ही परिस्थिती मध्ये कातडी सोललेली, डोळे फोडलेले, नखे एक एक काढलेली, अनन्वित अत्याचार होत असताना देखील छत्रपती संभाजी राजे ह्यांनी हिंदू धर्माशी तडजोड केली नाही. मुसलमान धर्म स्विकारला नाही. शेवटी ३९ दिवस दारात वाट बघत तिष्ठत उभे मरण – हिंदू म्हणून जाज्वल्य अभिमान असणाऱ्या त्या देहातील चैतन्य घेवून गेला. इतिहासकार म्हणतात हिंदू धर्मात असेल की मेल्यावर वैर संपते. पण औरंग्याच्या धर्मात हे होणे नाही. असे म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांच्या गतप्राण शरीराची खांडोळी खांडोळी केली आणि नदीतीरावरील पक्षांच्या भोजनस्थ बहाल केली. त्यानंतर औरंग्या ओक्साबोक्शी रडला, म्हणाला यां अल्ला अशी चार औलादं मला दिली असती तर आजपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानाचा रंग मी हिरवा केला असता!” कुठे ते छत्रपती संभाजी राजे यांचे हिंदुत्ववादी रक्त. आणि उद्धव साहेबांचे फिफ्टी फिफ्टी वाले हिंदुत्व. घरातला सल्लागार फितुर झाला. आणि केवळ अहंकार, असुयेपोटी तुम्ही मुख्यमंत्री झाला. अन् सभेत गप्पा हानताय व्हय हिंदुत्वाच्या! मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा उपयोग आपल्या पडत्या, धुमिल झालेल्या हिंदू प्रतिमेला सावरण्यासाठी, राजकारणी उपयोग करायला मुख्यमंत्री साहेब विसरले नाहीत. ज्या भोसले घराण्याने मुगलांची वासलात लावली. मराठा साम्राज्य उभे केले. तुम्हा आम्हाला मुसलमान होण्यापासून वाचवले त्या भोसले घराण्याची वासलात (वासलात=उपयोग) आज राजकारणासाठी लावली जातेय वाईट वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा इतिहास बदलला जातोय! वाईट वाटते. बाबासाहेब पुरंदरे जीवंत असताना त्यांचा जीवंतपणी सत्कार करणारे लोकं आता त्यांना दुषणे देताहेत हे बघताना वाईट वाटते. इतिहासात फेर बदल करण्याची भाषा वापरली जातेय. हे हिंदवी स्वराज्याचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
खरोखरी आमच्या मुख्यमंत्री मध्ये ती रग, ती धग आहे का? एक एक अवयव कापला जात असताना सुद्धा हिंदू धर्म न सोडणारे छत्रपती संभाजी राजे आणि कोरोनाच्या भितीने घरात दोन वर्षे लपून बसणारा, जनतेला वाऱ्यावर सोडून जनतेच्या पैशावर घरात बसून पगार घेणारा आमचा मुख्यमंत्री. वाचक मित्रांनो! कुठे तरी आताच्या शिवसेनेची नाळ जुळतेय का हिंदुत्वाशी??? आपल्या आजच्या शिवसेनेची! पण मुख्यमंत्री साहेबांचा आव अन् ताव असा जणू हिंदुत्व, महाराष्ट्र ह्यांना माहिती! बाकी सर्वसामान्य जनता काय मुर्ख आहे? मुख्यमंत्री म्हणजे “मला पाहा अन् फुलं वाहा” मी म्हणीन तेच् खरं!
नेमकी ही बाब आता सामान्य हिंदू नागरिकांच्या लक्षात आली. हिंदू मतदार दूर लोटला जातोय ही बाब लक्षात आली. बीएमसी निवडणुका तोंडावर आल्या तर काय? म्हणून स्वतः चे हिंदुत्व सिद्ध करायला ह्या सभेचं आयोजन. कदाचित काही मतं वळविण्यात यशस्वी झालो तर हा प्रयत्नांचा प्रपंच. आणि हेच् सरकार उत्तर प्रदेशात अयोध्येत फलकं चमकवतात ते आम्ही असली हिंदू आणि ते नकली हिंदू ! मुख्यमंत्री साहेबा, प्रभू श्रीरामाचे असंख्य भक्त. त्याला पारख असली भक्त-नकली भक्त, असली हिंदू-नकली हिंदू ची. पण आपले मुख्यमंत्री म्हणजे “मला पाहा नी फुलं वाहा! मी म्हणीन तेच् खरं!
मुख्यमंत्री साहेब आग कोणावर ओकत आहे तर आपलेच सख्खे चुलत भाऊ. दोघेही प्रबोधन कार ठाकरे ह्यांचे नातू. एकमेकांविरुद्ध गरळ ओकताहेत. एक मुख्यमंत्री पदावर बसून तर एक मुख्यमंत्री पदी बसायला मिळाले नाही म्हणून धडपडतोय. गंमत म्हणजे दोन्ही भाऊ एकमेकांविरुद्ध षड्डू ठोकुन उभे आहेत आणि दोघांचा बोलविता, कर्ता करविता धनी एक असावा आणि दोघांनाही माहित नसावे. ह्याला म्हणतात दिव्याखाली अंधार. पण भाषणात मुख्यमंत्र्यांची “री” एकच मला पाहा नी फुलं वाहा!
नंतरच्या भाषणात साहेब म्हणतात की सुशांतसिंग केस चे पुढे काय झाले? काही झाले नाही! साहेबांना अशी प्रकरणं का उकरून चिखलफेक करावीशी वाटते आहे? श्रीराम जाणे. मात्र गायब झालेला डाटा (सुशांत सिंग च्या लॅपटॉप मधला) जर अवतरला आणि राणे पिता पुत्र म्हणतात त्याप्रमाणे कोणी “पेंग्विन” त्यात डेटात आढळला तर!
पुढल्या भाषणात मग त्यांनी विविध मुद्यांपरी आमचे हिंदुत्व श्रेष्ठ कसे? बाबरी मस्जिद पाडली, फडणवीस नुसते उभे राहिले असते तर बाबरी मस्जिद पडली असती! अरे, हे काय बोलणे झाले? हे फडणवीसांवर केलेले व्यंग नाही का? शोभले का मुख्यमंत्री या नात्याने! आणि एखाद्या पोरीने असलेले व्यंग व्यक्त केले तर लगेच जेल? (केतकी चितळे च्या पोस्ट शी मी सहमत नाही. पण शारिरीक व्यंग हे शारीरिक व्यंग आहे)
त्यावेळी शिवसैनिकांनी पाडली त्याचा पुरावा म्हणजे बाळासाहेबांना आलेला फोन! आणि मी तिथे हजर होतो. हे काय पुरावे झाले? बाबरी मस्जिद पाडणारे मराठी बोलत होते आणि आमचे ऐकत नव्हते म्हणजे ते शिवसैनिक आहेत! साहेबा, हा बादरायण संबंध जोडताय आणि बिनधास्त मंचावरून पेलताय. पण ह्यानी सिद्ध होत नाही की मराठी भाषिक न मानणारा वर्ग म्हणजे शिवसैनिक. आणि तुम्ही आपल्या पक्षातल्या मराठी भाषी शिस्तीत जगणाऱ्या शिवसैनिकांची खिल्ली उडवीत आहात, असे वाटत नाही का? काही ही बोलायचे नी मला पाहा नी फुलं वाहा! मी पुरावेहीन बोललो तरी त्याला दुजोरा द्या. असे तुमचे मुद्दे होते.
पहिले ज्यावेळी फडणवीसांनी”वाझे बॉंब” फोडला त्यावेळी आपण झालात मुख्यमंत्री साहेबा, संजय राऊत झाले. ह्यांनी वाझेची बाजू घेतली होती. एक ईमानदार ऑफिसर अशी प्रतिमा जनमानसात रुजविण्याचा तुमच्याकडून प्रयत्न करण्यात आला मात्र झाले विपरीत “वाझे वसुलीला” पकडला तर त्या पाठोपाठ अनिल देशमुखांचा नंबर लागला. नवाब मलिक, कोरोना काळातील घोटाळे बाज भ्रष्टाचार बाहेर आले. नुकत्याच आलेल्या जाहीर बातमीनुसार यशवंत जाधव साहेबांनी सहा कोटी रोख रक्कम देऊन सोने विकत घेतले, पन्नास फ्लॅट्स आहेत त्यांचे नावाने. असे साहेबांचे कितीतरी मुद्दे सुटले भाषणात सांगायचे राहून गेले पण दावूद वर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री साहेबांचा जीव कळवळला. आणि त्यांनी नको ते आरोप भाजपा वर केले. की दावूद भाजपात आला तर मंत्री बनेल! सारे आरोप रद्द होतील वगैरै वगैरे… साहेबांनी वाझे ला चांगला कर्मचारी म्हणून पाठिशी घातले होते, हळूहळू ईडी मग साहेबांचे घरात आली होती. त्याचप्रमाणे दावूद वर केलेले भाष्य पण असेच काही ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण मागे एकदा दावूद आणि मुख्यमंत्री साहेब ह्यांच्या टेलिफोन संभाषण झाले अशी आवई उठवली गेली होती. ती जर खरी असेल तर ती पण शक्यता नाकारता येण्याजोगी नाही. आणि म्हणूनच मुख्यमंत्री साहेबांना दावूदचा पुळका! पण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले नं की दावूद भाजपात आला तर मंत्री बनेल. म्हणून ईडी चा धोशा. साहेबा, ईडी आली आणि रिकाम्या हाताने गेली असती तर तुम्ही ईडी ला सोडली असती का? ईडी घुसली की घबाड सापडते. ह्याचा अर्थ ईडी बरोबर जागी घुसते तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आता संजय राऊतांचे राहते घर आणि आठ गुंठे जमीन जप्त केली. राऊत साहेब, चुप का? दाल मे कुछ काला होगा तभी तो राऊत चुप है! वरना अब तक तो हंगामा खडा हो गया होता!
बरे! मुख्यमंत्री साहेब तुमचे लोकं जे पुरावे मिडिया समोर हालवतात ते कोर्टात सिद्ध होत नाहीत. हे कसले पुरावे? मग तुम्हाला खोट्या केसेस करण्याचे षडयंत्र रचावे लागते, असे फडणवीस म्हणतात. पुरावे देतात आणि पाचावर धारण बसते मविआ सरकारची. बरे! दिलेल्या पुराव्यांवरून गुन्हेगार शोधायचे सोडून तुमची माणसे निरनिराळ्या कायद्यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरता. ही कुठली नितीमत्ता!
तुम्हाला काय अधिकार छत्रपती संभाजी राजे ह्यांचे नखाची सर नाही, नितीमत्तेत तुमचे सरकार भ्रष्टाचारात अग्रणी, अशा परिस्थितीत हिंदू मतांनी तुम्हाला का जवळ घ्यावं?
शिवसेना सारख्या पक्षाला जो हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मान्यता प्राप्त आहे अशा पक्षाला स्वतः चे हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. तर ही मागल्या अडीच वर्षात केलेल्या चुकांची हिंदू मतदाराला झालेली जाणीव आहे जी तुम्हाला आता खाते आहे. एक चुक संपूर्ण शिवसेनेची दिशा बदलवून गेली. आजच्या भाषणाला वाटले होते की काहीतरी चांगले, तार्किक, स्वतः च्या झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करणारे भाषण असेल पण कालचे भाषण देखील सुमार, अहंकार, दर्पोक्ती ने भरलेले , “मला पाहा नी फुलं वाहा” अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे, मुख्यमंत्री च्या पदाला साजेसे नसणारे भाषण म्हणायला हरकत नसावी.

भाई देवघरे

Leave a Reply