संपादकीय संवाद – ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम नेतृत्वाने सामंजस्य दाखवण्याची गरज

वाराणसीत कशी विश्वनाथ मंदिराजवळच उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणाच्या वेळी शिवलिंग सापडल्याच्या माहितीने उभ्या देशात खळबळ उडाली आहे, हे वृत्त खरे असेल तर या ठिकाणीही पूर्वी मंदिराचं होते, आणि नंतर आक्रमकांनी या मंदिराला मशिदीत परिवर्तित केले, हा निष्कर्ष काढता येतो.
असे असले तरी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी तिथे मशिदच होती, असा दावा केला असून कयामतपर्यंत म्हणजेच जगाच्या अंतापर्यंत या ठिकाणी ज्ञानवापी मशिदच राहील असा दावा केला आहे. हे वक्तव्य लक्षात घेता आता राममंदिरानंतर या ज्ञानवापी मशिदीसाठीही हिंदू मुस्लिम संघर्ष तर सुरु होणार नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
आपल्या देशात आठव्या शतकानंतर मुस्लिम आक्रमकांनी इथल्या राज्यांवर हल्ले करून आपली सत्ता प्रस्थापित केली, त्यानंतर त्यांनी भारतातील हिंदूंची मंदिरे उध्वस्त करीत त्याठिकाणी मशिदी बांधल्या. अयोध्येतील राममंदिराबाबत हा वाद अनेक वर्षे चालला त्यामुळे राज्य आणि केंद्रातील सरकारेही डळमळीत झाली, शेवटी न्यायालयाने तो प्रश्न सोडवला आणि आता राममंदिर उभारणीची नव्याने सुरुवात झाली आहे.
असा प्रकार यापूर्वी सोमनाथ मंदिरातही झाला होता, आता राममंदिरानंतर मथुरा, काशी इथली मंदिरेही चर्चेत आहेत. ताजमहाल हेदेखील आधी तेजोमहाल होते असे सांगितले जाते आहे. भारतातल्या अनेक स्थानांची नावेही मुस्लिमांनी बळजबरीने बदलली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही परिस्थिती बदलणे गरजेचे होते, मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचे धोरण अवलंबले आणि याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परिस्थिती चिघळताच गेली.
आता सुदैवाने हिंदूंच्या भावनांची कदर करणारे सरकार सत्तेत आले आहे. याच सरकारने पुढाकार घेतल्यामुळे काश्मीरमध्ये ३७० कलम हटवले गेले. तिहेरी तलाख कायदाही बदलला गेला, त्यामुळे देशातले हिंदुत्वनिष्ठ नागरिक आता पुढे येत आहेत, सुदैवाने न्यायालयानेही या प्रकरणात सर्वेक्षणाचे आदेश दिले, त्यात वास्तव समोर येते आहे.
मात्र याचवेळी मुस्लिमांचा नव्याने संघर्ष करण्याचा इरादा व्यक्त झाला आहे, यातून काहीही सध्या होणार नाही, फक्त सामाजिक अशांतता निर्माण होईल, ही बाब लक्षात घेत देशातील मुस्लिम नेतृत्वाने सामंजस्य दाखवावे आणि असे तिढे सोडवावे इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply