बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या राड्याविरोधात भाजपच्या ३ कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल

पुणे : १७ मे – काल भाजप नेत्या स्मृती ईराणी यांचा पुण्यातील बालगंधर्व येथे कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या महिला आंदोलक वैशाली नागवडे यांच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या 3 कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी 1) भस्मराज तीकोने रा. कसबा पेठ, पुणे 2) प्रमोद कोंढरे रा. नातू बाग, पुणे 3) मयूर गांधी रा. शुक्रवार पेठ, पुणे यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.नं.57/22 भादवि कलम 354, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतीय जनता पार्टी, पुणे शहराच्या वतीने ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन महिला व बाल कल्याण केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली नागवडे यांच्यासह 3 महिला कार्यकर्ते रंगमंदिर येथे बसलेले असताना भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. त्या ठिकाणी निर्माण झालेला गोंधळ पाहून तातडीने बंदोबस्तास असलेल्या महिला पोलीस अंमलदारांनी त्या महिलांना सुरक्षित ताब्यात घेऊन नाट्यगृहा बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता काही भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली.
वैशाली नागवडे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार उपलब्ध व्हिडिओ क्लिप्स पाहून खात्री करून तीन भाजप कार्यकर्ते भस्मराज तीकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी यांच्या विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
00000000000
आसाममध्ये पूरस्थिती २० जिल्ह्यांतील २ लाख लोकांना पुराचा फटका
गुवाहाटी : १७ मे – उत्तर भारतात सातत्यानं उष्णतेच्या झळा वाढताना दिसत आहेत. संपूर्ण उत्तर भारत उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. पण आसाममध्ये मात्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला असून भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आसामच्या 20 जिल्ह्यांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. सोमवारी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या कछार जिल्ह्यात पुरामुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर दिमा हासाओमध्ये भूस्खलनामुळे तीन मृत्यूची नोंद झाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुराचा जवळपास 1,97,248 लोकांना फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं होजई आणि कछार मधील क्रमशः 78,157 आणि 51,357 लोकांना फटका बसला आहे.
प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, 20 जिल्ह्यांतील 46 महसूल मंडळातील एकूण 652 गावांना आतापर्यंत पावसाचा फटका बसला आहे. यासोबतच पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना सात जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे 55 मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 32,959 लोकांना आश्रय देण्यात आला आहे. त्याचसोबतच, बाधित भागांत 12 मदत वितरण केंद्रं देखील स्थापन करण्यात आली आहेत.
आसाममध्ये पावसानंतर आलेल्या पुरानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकं घटनास्थळी रवाना झाली आहेत. पुरात अडकलेल्या लोकांसाठी बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये 16 ठिकाणी बंधारे तुटल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भागात रस्ते, पूल आणि घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
सध्या पुरामुळे दिमा हासाओ येथील कम्युनिकेशन चॅनल बंद करण्यात आलं आहे. “भूस्खलनामुळे जिल्ह्याबाहेरून संपर्क साधता येत नाही. हाफलाँगकडे जाणारे सर्व रस्ते आणि रेल्वे मार्ग 15 मे पासून ब्लॉक करण्यात आले आहेत,” असं बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, गुवाहाटी येथील ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या रिलीझनं सांगितले की, दिमा हासाओमधील लुमडिंग-बदरपूर सेक्शनवर गेल्या दोन दिवसांपासून भूस्खलन आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे अडकलेल्या दोन गाड्यांमधील सुमारे 2,800 प्रवाशांना वाचवण्याचे काम सोमवारी सुरू होतं, ते पूर्ण झालं असून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

Leave a Reply