प्लायवूड कंपनीला लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक

नागपूर : १७ मे – कुही एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या प्लायवूड कंपनीला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कंपनीतील प्लायवूड व कच्चा माल, मशिनरीसह अन्य वस्तू बेचिराख झाले. या घटनेत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुही शहराजवळ असलेल्या मांढळ मार्गावरील एमआयडीसी भागात ईहा प्लायवूड इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. येथे प्लायवूड तयार करण्याचे काम केले जाते. या ठिकाणी कुही व परिसरातील ६0 ते ७0 पुरुष व महिला मजूर काम करतात. सोमवारी दुपारी ३ वाजतादरम्यान प्लायवूडला लावण्यात येणार्या ऑईलला आग लागली. ही आग क्षणात पसरली आणि जवळच असलेल्या इतर प्लायवूडच्या तुकड्यांना लागली. लगेच आगीचे लोळ इतरत्रही पसरत असताना कामगारांनी आग विझविण्याच्या प्रयत्न केला. परंतु, आगीचे तांडव इतके उग्र होते की, प्लायवूड तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी असलेल्या इतरही ऑईलला आग लागून मोठा भडका उडाला.
कंपनीमध्ये काम करीत असलेले ६0 ते ७0 महिला व पुरुष मजूर जीव मुठीत घेऊन कसेबसे बाहेर पडले. आग इतकी भयंकर होती की, क्षणात होत्याचे नव्हते झाले. आगीचा प्रकोप पाहता लागलीच उमरेड येथील अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळविण्यापर्यंत ९0 टक्के मशनरींसह प्लायवूड व लाकडे जळून बेचिराख झाली. आगीची तीव्रता एवढी होती की, कंपनीच्या छतावरील टिनाचे पत्रे अक्षरश: गळून पडले होते. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कंपनी मालक प्रभूदास पटेल (वय ५३, रा. पारडी, नागपूर) यांच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, अधिक तपास ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलिस करीत आहेत.

Leave a Reply