गडचिरोलीत रस्त्याच्या बांधकामासाठी आलेल्या वाहनांची नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ

गडचिरोली : १७ मे – जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मवेली या अतिदुर्गम गावात रविवारी रात्रीच्या सुमारास रस्त्यांच्या बांधकामासाठी आणलेल्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली.
एटापल्ली तालुक्यात योजनेअंतर्गत मवेली ते मोहूर्ली रस्त्याचे काम सुरू होते. मवेली या गावात रस्ते बांधण्यासाठी आणण्यात आलेली वाहने उभी करण्यात आली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांनी ही वाहने जाळल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. हे रस्त्याचे काम वल्लभाणी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
जाळण्यात आलेल्या वाहनांमध्ये २ पोक्लीन,१ ट्रक आणि एका ग्रेडरचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास दीड कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या वाहनांना लक्ष केले आहे. या जाळपोळीतून जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे.
एटापल्ली तालुक्यातील रामजी तिम्मा वय (४०) या व्यक्तीची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून १४ तारखेला नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. हत्या करण्यात आलेली व्यक्ती याच तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्र अंतर्गत समाविष्ट मेंढरी या गावातील रहिवासी होता. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ पत्रके टाकली होती.

Leave a Reply