हिंदुत्वाची टोपी ! – विनोद देशमुख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कालची “मास्टर सभा” फक्त आणि फक्त संघ परिवार, म्हणजेच भाजपा, देवेन्द्र फडणवीस आणि संघ यांच्यासाठीच घेतली गेली आणि टार्गेट संघ परिवाराचे हिंदुत्व, ही त्यांची थीम दिसली. रा. स्व. संघावर त्यांनी थेट टीका केली. संघाच्या टोपीवरही ते घसरले. भाजपाची हिंदुत्वाची टोपी भगवी आहे, तर संघाची टोपी काळी का, असा थेट सवालच शिवसेना पक्षप्रमुखांनी केला. वरवर पाहता, कोणालाही पटेल, असाच हा प्रश्न आहे. पण, त्याचे उत्तर दडले आहे अज्ञानात !
मूळ हिंदुत्ववादी (वय वर्षे 97) संघाबद्दल शिवसैनिकांना फारशी माहिती असावी, असे मला वाटत नाही. कारण, 40 वर्षांपूर्वी संघाची टिंगल करताना शिवसेना नेत्यांना मी पाहिले आहे. मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर हे तिघे विधान परिषदेत आमदार होते. ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यायचे. तेव्हा भाजपाशी त्यांची युती नव्हती. त्यामुळे ते उघडपणे भाजपा-संघवाल्यांचा उल्लेख “चड्डीवाले” असा करून थट्टामस्करी करायचे. नंतर शिवसेना मराठीवरून हिंदुत्वावर आल्यामुळे या लोकांचा संघाशी संबंध आला आणि त्यांची मते काही प्रमाणात बदलली. हे “परिवर्तन” पत्रकारांनी जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे, शिवसेना प्रारंभापासूनच हिंदुत्ववादी असल्याचा दावा आभासी आहे. नव्हे, खोटाच आहे ! एक मात्र खरे की, बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे कार्ड खूपच आक्रमकपणे खेळले. संघाला तसे करण्याची गरज कधीच नव्हती- पूर्वीही, आजही आणि उद्याही. कारण, संघाचे हिंदुत्व व्यापक, सर्वसमावेशक, वसुधैव कुटुंबकम् मानणारे अन् त्यासाठी प्रयत्न करणारे आहे.
तर, संघाच्या काळ्या टोपीवर आक्षेप घेणारे उद्धव ठाकरे यांना मुळात हेच माहीत नाही असे दिसते की, संघाने भगव्या ध्वजालाच गुरू मानले आहे. संघात व्यक्ती गुरू नाही, भगवा ध्वज म्हणजेच हिंदुत्वाचे गुरू ! वेळोवेळी संघप्रमुख राहणारे सरसंघचालक सुद्धा संघाचे चिंतक, मार्गदर्शक आणि मित्र याच भूमिकेतून काम करतात. पण ते गुरू नसतात. व्यक्तीऐवजी भगव्या ध्वजालाच गुरुस्थानी ठेवून संघाने आपले निखळ हिंदुत्व पहिल्या दिवसापासून (1925) जगजाहीर केले आहे. वाटचालीत मध्येच घेतले किंवा नंतर स्वीकारलेले नाही ! म्हणूनच संघ आज शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
राहता राहिला प्रश्न टोपीचा. टोपी हा संघाच्या गणवेशाचा भाग आहे. ते संघाचे प्रतीक नाही. घोंगडीची टोपी सोयीस्कर म्हणून निवडली गेली, तिचा रंग काळाच असणार ! कालपर्यंत हाफपँटचा समावेश गणवेशात होता. आता फुलपँट आहे. (यामुळे “चड्डीवाले” असे हिणवण्याची संधी हिसकली गेल्याचे अनेकांना वाईट वाटत असणार !) गणवेशाचा रंगही भगवा नाही. पूर्वी हाफपँट खाकी होता. आता फुलपँट ब्राउन झाला आहे. त्यामुळे, काळी टोपी का, हा प्रश्नच गैरलागू आहे. वेगवेगळे हिंदू संप्रदाय विविध रंगांच्या टोप्या परंपरेने वापरत असतात. त्यात कोणालाही गैर वाटत नाही. सर्वांचा झेंडा मात्र भगवाच असतो. हेच हिंदुत्वाचे मुख्य प्रतीक आहे. ते नीट सांभाळा आणि त्याला साजेसे वागा म्हणजे झाले. दुसऱ्याच्या हिंदुत्वाची अन् टोपीची चिंता कशाला करता ? हिंदुत्व टोपीत नसते, डोक्यात-मेंदूत असते, असे आपणच तर म्हणालात ! मग त्यावरून दुसऱ्याची टोपी का उडवता ? त्यापेक्षाही महत्त्वाचे, लोकांना टोपी का घालता ?!!

विनोद देशमुख

Leave a Reply