साहित्य संमेलन..बदल कधी होणार? – डॉ. विजय पांढरीपांडे

दरवर्षी प्रमाणे यंदाही साहित्य संमेलन उदगीर येथे होऊ घातले आहे.यावर्षी एक नव्हे तर दोन साहित्य उत्सव रसिकांच्या नशिबी आले.एक नाशिक अन् लगोलग दुसरे उद्गीरला.कुणाचा नाही तरी यामुळे पुस्तक विक्रेत्यांचा फायदा होईल अशी आशा करायला हरकत नाही.एरवी साहित्य संमेलन म्हणजे वाद हे समीकरण ठरलेले.हे संमेलन त्याला अपवाद ठरेल अशी आशा करू या.निदान अध्यक्षा बद्दल तरी आता पर्यंत कुणी बोलले नाही.तसेही निवडणूक बंद झाल्या पासून ,चुरस संपल्या मुळे निवडीचे वाद थांबले आहेत.ही एक सकारात्मक बाजू.गेल्या वर्षी संमेलनाला अध्यक्ष असूनही नव्हते.त्यानंतर यापुढे चालता बोलता अध्यक्ष निवडावा लागेल अशी अशलाघ्य टीका झाली. एका जगप्रसिध्द संशोधकाचा,विज्ञान लेखकाचा असा अप्रत्यक्ष अपमान यापूर्वी झाला नसेल.यापुढे अध्यक्ष निवडीपूर्वी त्यांचा मेडिकल रिपोर्ट तपासणार की काय कोण जाणे.
संमेलन हे दिवसेंदिवस लेखक वाचकांचे न राहता राजकीय प्रायोजकाचे होत चालले आहे.स्थानिक राजकारणी मंडळीच सगळ्या व्यवस्थेचा ताबा घेताना दिसतात.बाकी सारे मखरातले गणपती..पुजे पुरते..म्हणजे सत्कारापूर्ते.संमेलनाचे बजेट लाखो पासून आता करोडो पर्यंत पोहोचले.हा पैसा अप्रत्यक्ष पणे जनतेचा.पण या उधळ पट्टीत सामान्य रसिकांच्या हाती काय लागते,हा प्रश्न उरतोच.
खरे तर साहित्या संबंधी अनेक मूलभूत प्रश्न आहेत.पण त्यांची दखल घ्यावी असे कुणालाच वाटत नाही.या मंडळींचा अजेंडा वेगळाच असतो.भाषेच्या संवर्धनाचा प्रश्न आहे.बोली भाषेतून सृजनात्मक साहित्य निर्मिती चा प्रश्न आहे.प्रकाशकांनी लेखकांना लुटण्याचा,फसविण्याचा प्रश्न आहे.नवोदित लेखक, कवींना व्यासपीठ, प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रश्न आहे.लेखक प्रकाशकातील कॉपी राईट चा प्रश्न आहे.लेखक,संपादक,प्रकाशक,वितरक, पुस्तक विक्रेते यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे प्रश्न आहेत,आपले साहित्य इतर भाषेत जावे,इतर भाषांतील साहित्य मराठीत यावे यासाठी चळवळ निर्मितीचे प्रश्न आहेत, जगाच्या नकाशावर मराठीला मानाचे स्थान प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्नांच्या गरजेचे प्रश्न आहेत…इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमामुळे जे नवे आव्हान सामोरे आले,ते पेलण्याचे प्रश्न आहेत..अशी कितीतरी आव्हाने साहित्य क्षेत्रात आपल्यापुढे आहेत.पण साहित्य संमेलनातून अशा ज्वलंत विषयावर चर्चा होताना दिसत नाही.तेच ते वक्ते,तेच ते ठराविक कवी,तेच ते कंटाळवाणे चेहरे संमेलनाच्या व्यासपीठावर दिसतात.पूर्वी मोठमोठ्या लेखक कवींना भेटण्याची तरुण तरुणींना उत्सुकता असे.त्याच्याशी बोलावे ,चर्चा करावीहे स्वप्न असे.आता तो उत्साह नव्या पिढीत दिसत नाही.पूर्वी वाचक लेखकाशी पत्रा द्वारे संवाद साधत असे.लेखकाला देखील या पत्राचे अप्रूप वाटायचे. आता ते खूप कमी झाले आहे.ईमेल,चॅटिंग चा जमाना आहे.त्यात तो जुना ओलावा दिसत नाही.ओढ जाणवत नाही.
नव्या पिढीचे मातृभाषेत ले वाचन देखील खूप कमी झाले आहे.गावातले वाचनालय,शहरातले ग्रंथालय,यातील पुस्तकाची,वाचकाची,वर्गणीदाराची संख्या रोडावली आहे.
अजूनही साहित्य निर्मिती होते आहे. नवे दमाचे लेखक ,कवी अजूनही दिसतात.पण त्यांना प्रकाशात यायला बराच संघर्ष करावा लागतो. पैसे देऊन पुस्तकं प्रकाशित करण्याचे प्रमाण वाढले आहे.दर्जेदार ,सचोटीने व्यवहार करणाऱ्या,अनुभवी जाणकार प्रकाशक संपादकांची संख्या मर्यादित झाली आहे.यावर साहित्य संमेलनात गांभीर्याने चर्चा व्हायला नको का?प्रकाशक प्रिंटर ला, चित्रकाराला, डीटीपी करणाऱ्याला,विक्रेत्याला,अशा सर्वांना पैसे देतात.मग लेखकाने काय घोडे मारले.प्रथितयश लेखकाची गोष्ट वेगळी. किंवा स्वतःच्या टर्म्स वर पुस्तक देणाऱ्या सुप्रसिध्द लेखकाची गोष्ट वेगळी.पण उमेदीतली लेखक मंडळी पिसली जातात.भरडली जातात.कवितांना तर भावच नाही. तरी आताशा सोशल मीडिया वर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे परिस्थिती जरा बदलली आहे.पण छापील पुस्तकाचे स्वप्न बघणाऱ्याची चांगलीच होरपळ होते.साहित्य संमेलन,महामंडळ,परिषदा अशा संस्था या समस्या सोडविण्यासाठी काय करतात?एरवी संमेलनात अनेक ठराव संमत केले जातात. त्यांचा पाठपुरावा कोण करतं? त्याचे पुढे काय होते?अनेकदा साहित्य बाह्य विषय कळीचे,वादाचे ठरतात.एक बाकी खरे.निवडून आलेल्या, किंवा आजकाल सन्मानाने नामांकित केलेल्या अध्यक्षाची चलती असते.सत्कार,शाल नारळ,भाषणाची आमंत्रणे,पुस्तकं प्रकाशने,पुस्तकं संख्येत वाढ..अशी चंगळ असते.फार कमी जणा कडून काही तरी चांगले ,विधायक,सृजनात्मक कार्य घडते.ही मंडळी सर्व प्रसिद्धी तच मग्न असतात.वर्षा शेवटी त्यांची भाषणे छापली जातात.ग्रंथालयात तेव्हढीच भर पडते.
हे सगळे बदलता येणार नाही का?एका ऐवजी छोटी छोटी गावा गावातली संमेलने भरवावीत. लिट फस्त सारखे काहीतरी वेगळे,चर्चा सत्रावर आधारित कार्यक्रम करावेत.ओपन हाउस चर्चा व्हावी.वाचकाचे ऐकून घ्यावे. त्यांना काय हवे ते जाणून घ्यावे.प्रकाशक लेखकांना समोरासमोर बसवून त्याच्या समस्या समजून घ्यावा.सगळे आर्थिक व्यवहार पारदर्शी कसे होतील ते बघावे.इतर भाषांतील लेखकांना बोलवावे.त्याच्या भाषेत काय चालले आहे,त्याच्या अडचणी काय आहेत,ते जाणून घ्यावे.विविध भाषेत साहित्य सेतू कसे बांधता येतील त्यावर विचार मंथन व्हावे.नवोदितांना मार्गदर्शन म्हणून कार्यशाळा आयोजित कराव्या.सरकारवर अवलंबून न राहता,इतर प्रायोजक शोधावेत.साहित्य विश्वाला राजकारणापासून दूर ठेवावे..हे असे करण्या सारखे खूप आहे..पण लक्षात कोण घेतो.? हा अन् एव्हढाच प्रश्न आहे..
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असे आपण म्हणतो.पण माणसे दुरावली त्याचे काय? साहित्याने ही दुरावलेली मने, माणसे जवळ आणली पाहिजेत.इतिहासात कोण काय म्हणाले,कोण कसे वागले यावरून वाद घालायचे की ते तसे का वागले,त्यांनी कसे वागायला हवे होते याचा शोध घ्यायचा,अभ्यास करायचा?साहित्याने असलेले गैर समज दूर केले पाहिजेत.पण आजकाल काय दिसते?जाती धर्मावरून भिंती उभारण्याचे काम चालू आहे.त्याला पक्षीय राजकारणाचे खतपाणी अनायसे मिळते आहे.त्यामुळे संमेलन देखील या पक्षामुळे,अमुक नेत्यांमुळे यशस्वी झाले असे बोलले जाते.उद्घाटना पासून तर समारोपा पर्यंत हे नेतेच मिरवतात.अन् मंडळाचे पदाधिकारी त्यांची हुजरेगिरी करतात.त्याच्या मुळे देणग्या मिळतात हे कारण सांगितले जाते.त्यामुळे साहित्य संमेलन हे सरकारच्या,नेत्याचा,पक्षाच्या दावणीला बांधले जाते.पुढारी मिरवतात.साहित्यिक लाचार झाल्या सारखे वावरतात!याच कारणा मुळे अनेक श्रेष्ठ,ज्येष्ठ,नामांकित,साहित्यिक संमेलनात जात नाहीत.अनेकांना योग्यता असूनही अध्यक्षपद मिळाले नाही.खरे तर साहित्याला जात नसते,धर्म नसतो.
अनेक शहरात व्याख्यानमाला होतात.मेळावे होतात.साहित्य मंडळेअसतात.त्यांनी एकत्र येऊन ,विशिष्ठ ध्येय धोरणे ठेऊन,विषय ठरवून सहित्योत्सव करायला काय हरकत आहे.साहित्य हेएकांगी कधीच नसते.ते जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारेअसते.त्यामुळे अशा साहित्य संमेलनात केवळ साहित्यिक नव्हे तर इतर विचारवंत,कलाकार,संगीतकार,नाट्यकर्मी,चित्रकार,पर्यावरण तज्ञ,राजकारणी,समाजशास्त्रज्ञ,अशा सर्वाचा सहभाग हवा.एकमेकांना समजून घेत पुढे जाणे हेच संस्कृती संवर्धनाचे लक्षण आहे.
करोना काळानंतर नुकताच कोलकत्तायेथे बोईमेलाम्हणजे ग्रंथोत्सव साजरा झाला.या उत्सवात १८लाख वाचकांनी १५दिवसात २०कोटी रु ची पुस्तकंखरेदी केली!वाचन कमी झाले अशी ओरड करणाऱ्यांसाठी ही घटना बोलकी आहे.डोळ्यात अंजन घालणारी आहे.
आपण भारतीय, त्यातही मराठी माणूस अल्प संतुष्ट असतो.आपली झेप,आपली स्वप्नमर्यादित असतात.सध्याची जागतिक प्रगती, घोडदौड लक्षात घेता,कुठल्याही क्षेत्राततोच तो पणा,पाणचटपणा नकोय.नावीन्य हवे.भविष्याचा वेध हवा.विचार कक्षाचा विस्तार हवा.आपले साहित्य संमेलन मात्र छोट्याशा त्रिज्येच्या वर्तुळातच घुटमळतआहे.आपण आता तरी या कुपमंडूकमनोवृत्तीतून बाहेर पडायला हवे.यासाठी तरुणांनी पुढे यावे.पांढऱ्या केसांचे मार्गदर्शन घ्यावे.पण नव्या कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहावा.तेच ते जुने धडे गिरवणे आता तरी थांबवावे.

डॉ. विजय पांढरीपांडे
७६५९०८४५५५

Leave a Reply