संपादकीय संवाद – उद्धवजींच्या कांगाव्याला जनता फसणार नाही

१ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस या दोघांनी घेतलेल्या जाहीर सभांना उत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मास्टर सभा आयोजित ,केली होती, या सभेची प्रचंड जाहिरात झाली होती, याच काळात शिवसेनेवर आणि खुद्द उद्धव ठाकरेंवर जे काही आरोप झाले, त्या आरोपांना उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे सगळेच लक्ष ठेऊन होते. मात्र सभेनंतर उद्धव ठाकरेंचा हा फुसका बॉम्ब असल्याचे दिसून आले आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप केले होते, सभेची जाहिरात करतांना शिवसेनेने अनेकांचे मास्क उतरवणार असे जाहीर केले होते, मात्र जुनीच टेप वाजवण्यापलीकडे उध्दवपंतांनी काहीच नवे केले नाही. सध्या उद्धव ठाकरे हे फक्त पक्षप्रमुख आहेत, असे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे आपल्या अधिकारात आपण काय काय केले, हे सांगून ते विरोधकांची तोंडे बंद करतील अशी अपेक्षा होती. मात्र कोणतीही ठोस कामे किंवा ठोस माहिती त्यांनी दिली नाही, विरोधकांवर निरर्थक बिनबुडाचे आरोप करण्यातच त्यांनी शक्ती वाया घालवली.
एखाद्या शाळकरी मुलाने चोरी केलेली असते, वर्गात शिक्षक जेव्हा विचारतात तेव्हा कुणी काही बोलण्याआधीच ज्याने चोरी केलेली असते, तो उठून उभा राहतो आणि मी चोरी केली नाही असे उच्चारवाने सांगू लागतो, आणि इतरांनी चोरी केली असेल अशी शंका घेत इतर मित्रांची नावे घेऊ लागतो, त्यातच त्याची चोरी पकडली जाते. उद्धव ठाकरे देखील नेमका हाच प्रकार असतात असल्याचे जाणवते आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नैतिकता गुंडाळून ठेवत आणि हिंदुत्वाला तिलांजली देत विरोधकांशी मैत्र करून सत्ता मिळवली खरी मात्र त्याचा परिणाम त्यांचा मतदार दुखावण्यात झाला, त्यामुळे आम्ही किती बरोबर आहोत, आणि विरोधकच कसे चुकले आहेत आणि चुकत आहेत हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
या पर्यटनात जनता फसेल असे उद्धवजींना वाटते खरे, मात्र जनता हुशार झाली आहे या कांगाव्याला जनता बळी पाळणार नाही याचे भान उद्धवजींनी ठेवावे, इतकेच सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply