गेल्या ५० वर्षात १०० हुन अधिक वेळा उष्णतेची लाट सोसणारे नागपूर हे राज्यातील एकमेव शहर

नागपूर : १६ मे – सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच नागपुरातून एक बातमी समोर आली आहे. उन्हाच्या काहीलीने नागपूरकरांची लाही लाही होत असताना त्यात भर टाकणारी आणखी एक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 50 वर्षात एकट्या मे महिन्यामध्ये 100 हून अधिक वेळा उष्णतेची लाट पाहिलेलं नागपूर हे राज्यातलं एकमेव शहर ठरलं आहे.
गेल्या 50 वर्षात एकट्या मे महिन्यामध्ये 100 हून अधिक वेळा उष्णतेची लाट पाहिलेलं नागपूर हे राज्यातलं एकमेव शहर ठरलं आहे. भारतीय हवामान खात्यानं 1969 ते 2019 या 50 वर्षांची आकडेवारी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यात मे महिन्यात तब्बल 107 वेळा नागपूरकरांनी उष्णतेची लाट अनुभवल्याचं दिसून यआलं आहे. यामध्ये 90 दिवसांसह चंद्रपूर दुसऱ्या स्थानावर तर 80 दिवसांसह यवतमाळ तिसऱ्या स्थानावर आहे. काँक्रीटीकरणामुळे या उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, एकीकडे उष्णतेची लाट असतानाच दुसरीकडे अवघ्या काही तासातच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रास, मराठवाड्यात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply