इतवारीतील इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला भीषण आग

नागपूर : १६ मे – वाढत्या तापमानाने शहरात आगीच्या घटनांतही वाढ झाली. रविवारी सायंकाळी इतवारीतील एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला आग लागली. यात लाखो रुपयांच्या इमिटेशन ज्वेलरीसह इतर साहित्यही जळाले. रविवारी दुकान बंद असल्याने ग्राहक नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
इतवारीतील पोस्ट ऑफिससमोरील धारस्कर रोडवरील प्रियदर्शनी इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आग लागली. दुकानातून धूर दिसताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन विभागाच्या विविध केंद्रावरून चार अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले.
परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले. इमिटेशन ज्वेलरीसह मॅचिंग सेंटर असल्याने कापडही होते. त्यामुळे आगीने काही वेळातच संपूर्ण दुकान कवेत घेतले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी येथे पोहोचताच पाण्याचा मारा केला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु यात लाखो रुपयांची इमिटेशन ज्वेलरी, पंखे, काचाचे शोकेस आदी जळाले. रविवार असल्याने या परिसरातील दुकाने बंद होती. त्यामुळे आग विझविण्यासाठी मोकळी जागा होती. रविवार असल्याने परिसरात काहीच गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply