आभारचा भार कशाला? – प्रकाश एदलाबादकर

काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशन समारंभाला श्रोता म्हणून गेलो होतो . पुस्तकाचा लेखक माझा मित्रच होता. कार्यक्रम अपेक्षेपेक्षा लांबला .या कार्यक्रमातील आभारप्रदर्शन अंगावर काटा आणणारे होते. आभारप्रदर्शनात किती,कसे आणि काय बोलावे याचा अनेकांना धरबंध नसतो.
‘आभाराचा भार कशाला ?
गळा फुलांचे हार कशाला ?
हृदयामध्ये घर असावे
त्या हृदयाला दार कशाला ?
अशी सुरुवात असलेली आणि अगम्य कविता म्हणून आभारप्रदर्शनाला सुरुवात झाली . जवळपास पंधरा ते वीस मिनिटांचे ते आभारप्रदर्शन ऐकताना श्रोत्यांमधील चुळबुळ आणि व्यासपीठावरील पाहुण्यांचे अगतिक चेहेरे अजूनही डोळ्यासमोर येतात . त्या आभारप्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीने ए-फोर साईझची अडीच पाने लिहून आणली होती . आता इतक्या परिश्रमाने लिहून आणलेल्या मजकुरातील अक्षर न अक्षर तर वाचलेच पाहिजे . अगोदरच कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा पाऊण तास उशीरा सुरु झालेला होता . पुस्तकाच्या लेखकाचे मनोगत , प्रकाशकाचे भाष्य , परिचय करून देणाऱ्याचे वक्तव्य , दोन विशेष अतिथी ,एक प्रमुख अतिथी आणि समारंभाध्यक्ष अशी एकूण अघळपघळ ,ऐसपैस आणि सज्जड सात भाषणे आणि अधूनमधून कवितांचा मारा असलेले ,आलंकारिक भाषेतील ,अघळपघळ ,शब्दबम्बाळ आणि कागदावर लिहून आणलेले सूत्रसंचालन ! मन आणि शरीर आंबून गेले होते . या सर्वांवर पस्तुरी म्हणून हे आभार !! ‘आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळातवेळ काढून आलेल्या ‘ प्रत्येक पाहुण्याच्या भाषणाचा आढावा त्या आभारप्रदर्शकाने बसल्या जागी लिहून काढला होता . त्याने मुळात लिहून आणलेल्या कागदात याची भर पडली होती . आढावा घेत आभार सुरु झाले . नंतर लेखकाचे आप्तेष्ट , कुटुंबीय ,मित्र यांचे नाव घेत आभार मानणे झाले . माध्यमांच्या प्रतिनिधींचे आभार मानून येथपर्यंत संपेल असे वाटत असतानाच सभागृहवाले , माईकवाले , केटरर्स , यांचाही नंबर लागला .अधून मधून “मला दोन ओळी सुचल्या ” ह्या वाक्याची फोडणी होतीच . हुश्श ssssss !!! कधीकधी तर हे आभार मानणारे अध्यक्षांच्या समारोपीय भाषणावर बोळा फिरविणारेही असतात . असे आभारप्रदर्शन अक्षरशः अंगावर येते !
अशा स्वरूपाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ” वेळेचे भान ” हे सर्वांनीच ठेवायचे असते . आभारप्रदर्शन करणाऱ्याने आणि सूत्रसंचालन करणाऱ्याने तर अत्यंत काटेकोर असले पाहिजे . बरे ,अनेकांना हे ठाऊक नसते की, आभार हे ‘ मानायचे ‘ असतात आणि धन्यवाद हे ‘द्यायचे ‘ असतात . ‘ मी अमक्या तमक्याचे धन्यवाद मानतो ‘ सर्रास बोलले जाते .अजून तरी ‘ मी यांना आभार देतो ‘ हे वाक्य ऐकायला मिळाले नाही .
धन्यवाद हे ‘मनःपूर्वक ‘ किंवा ‘ मनापासून ‘ द्यायचे असतात . आभार हे सुद्धा ‘ मनःपूर्वक ‘ किंवा ‘मनापासून ‘ मानायचे असतात . आजकाल ते ‘ मनस्वी ‘ मानतात किंवा देतात ! आभार किंवा धन्यवाद याना हे विशेषण कुणी लावले हे कळायला मार्ग नाही . ‘ मनस्वी ‘ याचा अर्थ मनाला वाट्टेल तसे ‘ !! उदा. ‘ त्याला बोलून काहीही उपयोग नाही .त्याचा स्वभाव मनस्वी आहे.’ हे वाक्य नीट वाचा.
आभार प्रदर्शन सुरु झाले की ,श्रोते काढता पाय घ्यायला सुरुवात करतात. सगळ्यांना घाई असते . समारंभानंतर चाऊम्याऊ असेल तर ,असे भरपूर लांबीरुंदी असलेले नीरस आभारप्रदर्शन ऐकत नाईलाजाने बसून राहतात . आजकाल एक चांगली प्रथा आली आहे . प्रमुख वक्त्यांच्या भाषणापूर्वीच आभार प्रदर्शन आटोपण्याची प्रथा .व्यासपीठावरील सन्मानानीय अतिथींची भाषणे पुढे होणार असल्याने आभारप्रदर्शनाला तसाही आळा बसतो आणि ते नेमके होते . हीच प्रथा आता पाळावी असे वाटते .
असे झाले तर ,अध्यक्षांचे समारोपीय भाष्य झाले की , सूत्रसंचालकाने ” अध्यक्षांच्या परवानगीने ‘ मी समारंभ संपला असे जाहीर करतो .’ इतकेच बोलावे . आणि आभार प्रदर्शन जर शेवटी असेल तर , ‘आजच्या समारंभाचे अध्यक्ष , सन्माननीय अतिथीगण , उपस्थित श्रोतृवर्ग आणि समारंभाच्या यशस्वीतेसाठी ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार मानून ,अध्यक्षांच्या वतीने समारंभ संपला असे मी जाहीर करतो ‘ इतकेच आणि येवढेच बोलावे . उगाचच ‘ आभारचा भार कशाला ….’ वगैरे आचरटपणा करू नये .
आपले आभारप्रदर्शन हा उपस्थितांच्या थट्टेचा विषय होऊ नये हे भान आपणच बाळगायला हवे ना ?

प्रकाश एदलाबादकर , नागपूर

Leave a Reply