‘आई दिवसा’ प्रमाणे ‘पत्नी दिवस’ पण असावा – रामदास आठवले यांची मागणी

सांगली : १६ मे – ‘आई दिवसा’ प्रमाणे ‘पत्नी दिवस’ पण असावा, अशी मागणी केंद्रीय सामजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पत्नी देखील आई असते आणि आपल्याला घडवण्यामध्ये तिचे मोठे योगदान असते, असेही यावेळी मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले. आठवले सांगलीमध्ये पार पडलेल्या राजमाता जिजामाता आदर्श आई पुरस्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
सांगलीच्या इनाम धामणी येथील राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने ‘राजमाता जिजाऊ आदर्श आई’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा पुरस्कार सोहळा 9 मे रोजी सांगलीमध्ये पार पडला. ज्यामध्ये जिल्ह्यातल्या अनेक आदर्श आईंचा रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कवितेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी कवितेच्या माध्यमातून आईच्या बद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली.
मंत्री रामदास आठवले यांनी आईबद्दल कविता सादर करताना म्हटले, ज्या प्रमाणे मदर्स डे, आईचा दिवस आहे, तसेच ‘वाईफ डे’ पण असला पाहिजे. पत्नी देखील आई असते आणि आपल्या पत्नीचे आपल्याला घडवण्यामध्ये फार मोठे योगदान असते. त्यामुळे, पत्नी दिवस पण असला पाहिजे, अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली.

Leave a Reply