राजीव कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : १३ मे – निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची गुरुवारी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. विद्यमान आयुक्त सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ १४ मे रोजी संपत आहे. कुमार १५ मे रोजी पदभार स्वीकारतील, असे कायदा मंत्रालयाने अधिसूचनेत नमूद केले आहे.
कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी यासंबंधीची अधिसूचना आणि प्रसिद्धपत्रक ट्विटरवर प्रसिद्ध करून कुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच होणाऱ्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांव्यतिरिक्त सन २०२४ची लोकसभा निवडणूक आणि काही विधानसभा निवडणुका कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहेत. १९६०मध्ये जन्मलेले कुमार फेब्रुवारी, २०२५च्या मध्यापर्यंत या पदावर राहतील. निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा कुमार सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (पीईएसबी) अध्यक्ष होते. तत्कालीन निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी राजीनामा दिल्यानंतर एक सप्टेंबर, २०२० रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. बिहार-झारखंड केडरचे १९८४च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेले कुमार फेब्रुवारी २०२०मध्ये सेवानिवृत्त झाले होते.

Leave a Reply