कोळसा घोटाळ्यात देशाची ३० ते ३५ लाख कोटींची होणारी लूट वाचली – हंसराज अहिर

नागपूर : १३ मे – संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोळसा घोटाळ्यात देशाचे १.८६ लक्ष कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष कॅगच्या अहवालात काढण्यात आला होता, प्रत्यक्षात या प्रकारात देशाची ३० ते ३५ लाख कोटी रुपयांची लूट होणार होती, हे वास्तव समोर येत असल्याचा दावा कोळसा घोटाळा उघड करणारे भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज नागपुरात एका पत्रपरिषदेत बोलतांना केला.
हा घोटाळा उघड झाल्यावर मोदी सरकारच्या काळात सर्व जुने कोल ब्लॉक्स रद्द करून नव्या पारदर्शी पद्धतीने कोलब्लॉक्सचे लिलाव करण्यात आले होते, या व्यवहारात २०१४ ते १९ या काळात सरकारला ३.३५ लाख कोटींचा फायदा झाला, नंतर २०२१ पर्यंत हा फायदा ७ लाख कोटीवर गेला होता अशी माहिती अहिर यांनी दिली.
हा कोळसा घोटाळा आणि यातील भ्रष्टाचार हा जगातील सर्वात मोठा घोटाळा होता, असे स्पष्ट करत त्यावेळी रद्द झालेल्या कोल ब्लॉक्सपैकी फक्त ५० कोल ब्लॉक्स कार्यान्वित झाले आहेत, सर्व २०८ ब्लॉक्स कार्यान्वित होतील तेव्हा देशाला ३५ लाख कोटीच्या घरात महसूल मिळेल याकडे त्यांनी लक्ष वेधले. संपुआ सरकारच्या काळात हे सर्व कोल ब्लॉक्स फुकट वाटले गेले होते, त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होणार होते, असे अहिर यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष भाजपवर उद्योगपतींकरिता काम करत असल्याचा आरोप करतो मात्र काँग्रेसचं उद्योगपतींसाठी काम करत होते, डॉ. मनमोहनसिंह यांच्या काळात नवीन जिंदाल या काँग्रेसच्या उद्योगपती खासदाराला २९०० मिलियन मॅट्रिक टन कोळशाचे ब्लॉक्स फुकट देण्यात आले होते, आणि त्याची किंमत १० लाख कोटींच्या घरात जात होती, अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेला कोळसा तुटवडा हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचे आणि कमिशनखोरीचे परिणाम असल्याची टीका त्यांनी केली. विदर्भात महाजेनकोच्या अखत्यारीत येणारे कोळ ब्लॉक्स वापरले तर महाजेनकोची गरज सहज भागू शकते, मात्र कमिशन खाण्यासाठी इंडोनेशिया मधून कोळसा मागवला जातो असा आरोप त्यांनी केला.

Leave a Reply