हे माहीत असायलाच हवे…

पंजाबमध्ये ज्ञात असलेली मराठी नररत्ने

पंजाबात दोन मराठी माणसांची नावे विशेष आदराने घेतली जतात.

एक म्हणजे संत नामदेव आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राला अक्षरश: ठावूकही नसलेले पण भारताच्या स्वातंत्र संग्रामात अत्यंत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या इतिहास प्रसिद्ध ‘गदर’ पार्टीची स्थापना करणारे हुतात्मा श्री. विष्णू गणेश पिंगळे.

भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.

महाराष्ट्राचे सुपुत्र असूनही आपल्याला त्यांच्याविषयी फारशी माहिती नाही.
ही उपेक्षा थोड्याफार प्रमाणात तरी कमी व्हावी, म्हणून हा लेखनप्रपंच!

विष्णु गणेश पिंगळे (जन्म : २ जानेवारी तळेगाव ढमढेरे , १८८९; मृत्यू : लाहोर, १६ नोव्हेंबर, १९१५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते.

त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली.

विष्णु गणेश पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे या गावचे राहाणारे असून १९११ साली अमेरिकेतून ईंजिनिअर झाले होते..

देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला.
ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले.
त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले.

पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले.

रासबिहारी बोस, पिंगळे, कर्तारसिंग सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ या दिवशी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि ८ क्रांतिकारक फासावर चढले.
त्यांपैकी एक होते विष्णू गणेश पिंगळे!

स्वातंत्र्य हे प्रत्येक देशाला परमेश्‍वरानं दिलेलं बहुमूल्य असं वरदान आहे. स्वदेश हे आम्हाला दिलेलं गृह आहे. पण, तेच जर कुणी हिसकावून घेतलं, तर त्याचा प्रतिकार करणं, त्यासाठी मरे-मरेस्तोवर झुंजणं हे आपलं कर्तव्य ठरतं, या तत्त्वज्ञानावर ठाम विश्‍वास असलेले विष्णू गणेश पिंगळे होते. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यावाचून आपलं दैन्य, दु:ख संपणार नाही, याचं वास्तववादी भान त्यांना होतं.

पिंगळे मूळचे शिरूर जिल्ह्यातील तळेगाव- ढमढेर्‍याचे. ते लहानपणी अगदी अशक्त होते. परंतु, मातोश्रींनी केलेली व्रतवैकल्ये आणि चौरस आहार यांनी त्यांची तब्येत सुधारली. इतकी सुधारली की, वडिलांना पाठीवर घेऊन एका दमात ते सज्जनगडावर गेले!

पुढील शिक्षणासाठी ते पुण्याजवळील तळेगाव-दाभाडे येथे आले. याच शाळेत त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले. पिंगळे धप्प गोरे होते.

त्यांची उंची होती फक्त ५ फूट ४ इंच. पण, त्यांचं कर्तृत्व त्यापेक्षा सहस्रपटीनं मोठं होतं.

मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांव्यतिरिक्त त्यांनी उर्दू आणि पंजाबी भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.

पण, इथे एक वेगळंच खूळ त्यांच्या डोक्यात शिरलं. साधू बनून ते सर्व भारतभर हिंडले. वेशांतराची ही कला पुढे त्यांना चांगलीच उपयोगी ठरली. पण, त्यांची खरी महत्त्वाकांक्षा होती मेकॅनिकल इंजिनीअर बनण्याची.
अक्षरश: पै न् पै जमा करून ते अमेरिकेला गेले.

तिथेही लाकडं फोडून पैसे जमविण्याचा उद्योग त्यांनी आरंभला.
यावेळी त्यांचे वडील वारले. दु:खाने ते अगदी वेडेपिसे झाले. ‘‘मी अशी एखादी विद्या शिकेन की, ज्यायोगे आपले कर्ज फिटेल’’ असे त्यांनी वडिलांना वचन दिले होते.
पण, आता ते कसे शक्य होते?

या वेळेपावेतो त्यांच्यातील संघटनवृत्ती, मनाचा प्रेमळपणा, स्वातंत्र्याविषयीची ओढ इत्यादी गोष्टींचा परिचय इतरांना झाला होता.

अमेरिकेत ते बुद्धिवादी विचारसरणी आचरू लागले होते. हा काळ भारतीय क्रांतिकारकांच्या दृष्टीनं उलथापालथीचा होता. याचा पिंगळे यांच्यावर चांगलाच परिणाम झाला.

यावेळी लाला हरदयाल या बुद्धिवान व्यक्तींनी ‘गदर’ म्हणजे उत्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या चळवळीला जोरात चालना द्यायचा प्रयत्न चालवला.

त्यात पिंगळ्यांचाही समावेश होता. क्रांतीचा प्रचार करणारी भाषणे, पत्रके त्यांनी अमेरिका, युरोपादी देशांमधून वाटली. देशाबाहेर असणार्‍या हजारो हिंदी युवकांना इंग्रज सरकार उलथवून टाकण्याच्या उठावणीसाठी उद्युक्त केले.

पहिल्या महायुद्धाची बातमी या लोकांना मिळालेली होतीच. ‘हीच संधी अन् हीच वेळ, उचल शस्त्र अन् हो तय्यार,’ हेच सूत्र त्यांनी आरंभलं.
इतकंच नाही, तर हिंदी सैन्य स्वातंत्र्यासाठी क्रांतिपक्षाकडे फितवून घेण्याच्या विभागाचे ते प्रमुख बनले. ‘‘आपण जागं व्हावं आणि इतरांना जागं करावं,’’ या सूत्राला अनुसरून अमेरिकेतल्या आपल्या भविष्याला तिलांजली देऊन ते भारतात आले.

‘कोमा गाटा मारू’ या जहाजातून हजारो क्रांतिकारक भारतात यायला निघाले. तर, ‘तोसा मारू’ या बोटीनं पौर्वात्य देशातून अनेक जण भारतात यायला निघाले. हिंदुस्थानात युरोपीय सैन्याच्या अभावी हिंदी सैन्यात इंग्रजांविरुद्ध द्वेषाग्नी भडकवून द्यायचा आणि संकल्पित उठावणी करून देशात उत्पात घडवायचा, इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडायचे, अशी योजना होती.

कलकत्त्यात त्यांची गाठ रासबिहारी बसूंशी पडली.

पिंगळे यांना अनेक भाषा येत असल्यामुळे, शिवाय ते वेषांतरात पटाईत असल्यामुळे गुप्तपणे प्रचारकार्य करत राहिले.

वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या भेटीगाठी घेत त्यांनी पंजाब प्रांत पिंजून काढला.
तरीही कलकत्ता, बनारस वगैरे ठिकाणी त्यांची भ्रमंती चालू होतीच.
१९१४ पासून पंजाब प्रांतात उठावाचं वातावरण तयार होऊ लागलं होतं. या उठावाचे मास्टर माईंड म्हणून रासबिहारी व पिंगळे यांना पकडून देण्यासाठी सरकारने पारितोषिके लावली.

१९१५ साली रासबिहारींनी सर्व क्रांतिकारकांना देशासाठी बलिदान करायचं आवाहन केलं.

या बैठकीनंतर पिंगळे मीरतला गेले. तेथील हिंदी सैन्याला फितवून पुढे आग्रा, कानपूर, अलाहाबाद येथील सैनिकांचा क्रांतीसाठीचा मनोदय जाणून ते अमृतसरला परतले.

१ मार्चला हिंदी सैन्य युरोपला पाठवलं जाणार होतं. त्याआधीच उठावणी होणं गरजेचं होतं.

सिंगापूरपर्यंत जागृत केलेला लोकांचा देशाभिमान, त्यांची तेजाने तळपू पहाणारी मृत्युंजय वृत्ती थंड होण्याच्या आत तिचा लाभ उठवणं महत्त्वाचं होतं. सबंध जनतेलाच या उठावणीसाठी सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

केवढ्या मोठ्या, प्रचंड भू-भागावरील लोकांमध्ये त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी करावयाच्या उत्थानासाठी क्रांतीचं जाळं विणलं होतं, ते कृतीत आणण्यासाठी जी रक्तांची शिंपणं केली होती, त्याला इतिहासात तोड नाही.
अशा कामासाठी काळजात आग, मस्तकात निश्‍चय आणि मनगटात ताकद असावी लागते.
पण, ही योजना फसली.

हिंदुस्तानी लोकांच्या दृष्टीने अत्यंत स्वस्त असलेल्या गोष्टींमुळे- फितुरीमुळे पिंगळे व रासबिहारी सरकारच्या हातून सुटले.

अजिबात निराश न होता, त्यांनी परत क्रांतीचा आराखडा तयार केला.

मीरत येथील घोडदळास भेट देऊन, त्या लोकांना उठावणीसाठी प्रवृत्त केलं.
यावेळी त्यांनी आपलं सर्व साहित्य एका अफगाण दफेदाराजवळ दिलं. रासबिहारींच्या चाणाक्ष नजरेला यातला धोका जाणवला.

त्याच व्यक्तीच्या फितुरीमुळे पिंगळे पकडले गेले. तुरुंगात त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. शेवटी क्रांतीतला आपला सहभाग त्यांनी अधिकार्‍यांना सांगितला, पण अशा पद्धतीनं की, त्यामुळे फाशीची शिक्षा पक्की होईल.

त्यांचे हे उद्गार म्हणजे भारतीय क्रांतिकारकांची त्यागाची ही परिसीमाच होती.
या सर्वांवर कडी करणारा प्रसंग म्हणजे, विष्णू पिंगळ्यांच्या मातोश्री जेव्हा त्यांना तुरुंगात भेटावयास आल्या तेव्हाचा.

हा प्रसंग तर अगदी हृदयाचा कंदच हलवून सोडणारा होता.

असं वाचण्यात आलं की, त्यांच्या मातोश्री जेव्हा त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात आल्या तेव्हा, दु:खाचा आवेग आवरला नाही, तर या कल्पनेने ते पाठ फिरवून बसले.
खूप समजाविल्यानंतर संभाषणासाठी त्यांनी मातोश्रींकडे तोंड फिरवले. पण, त्यांना पाहताच त्या मूर्च्छित पडल्या.

भावबंध क्षणात तोडले तर तुटतात, नाहीतर त्याच्या पाशातून मन मोकळे होणे, कठीण असते, हे ते जाणून होते. मातृभूमीच्या मानेभवती परवशतेचा पाश पडलेला असताना, तिच्या पुत्राने जगावे कसे अन् मरावे कसे, हे त्यांनी जगाला दाखवले.

फाशीच्या आदल्या रात्री एक इंग्रज अधिकारी त्यांच्याविषयीच्या सहानुभूतिपोटी म्हणाला, ‘‘आम्ही तुम्हाला शक्य तितक्या अधिक काळ जिवंत ठेवलं.’’ त्यावर पिंगळे ताडकन् उद्गारले, ‘‘चुकलात तुम्ही. अशानं स्वर्गात गेलेल्या माझ्या सहकार्‍यांना वाटेल की, मी त्यांचा विश्‍वासघात केला की काय?’’

असे हे विष्णू गणेश पिंगळे १६ नोव्हेंबर १९१५ रोजी अत्यंत धीरोदात्तपणे फासावर गेले.

हे क्रांतिवीरा, तुला आमचे शतश: प्रणाम!

वंदे मातरम्

संकलन : पंचनामा

Leave a Reply