सोशल मीडियाची, शिवभक्तांची ताकद काय आहे हे गेल्या काही दिवसांत समजले – संभाजीराजे

सातारा : १२ मे – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरकसपणे भूमिका मांडणारे खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन इथून पुढे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. आजपासून आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट करताना अप्रत्यक्षपणे भाजपाची साथ सोडत असल्याचं देखील स्पष्ट केलं. या पार्श्वभूमवीर त्यांनी केलेल्या ‘स्वराज्य’ या नव्या संघटनेच्या स्थापनेवरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. ही संघटना पुढे राजकीय पक्षाचं रूप धारण करून निवडणुकांच्या राजकारणात उतरणार का? याविषयी चर्चा सुरू होताच त्यावर देखील संभाजीराजे भोसले यांनी याच पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
स्वतंत्र पक्ष स्थापन करावा असं अनेकांनी सुचवलं असल्याचं संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले. “तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करायला हवा असं अनेकांनी सांगितलं. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सोशल मीडियाची, शिवभक्तांची काय ताकद आहे हे गेल्या काही दिवसांत समजलं. या ५-६ दिवसांत अनेकांनी मला शक्य त्या सर्व माध्यमातून सांगितलं की संभाजीराजे, तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा. मी त्यांचा आदर आणि आभार व्यक्त करतो. हीच भावना आमच्याबद्दल राहू द्यावी”, असं ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना हा आपल्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असल्याचं सांगतानाच संभाजीराजे भोसले यांनी निवडणुकीच्या राजकारणात भविष्यात उतरणार असल्याचे संकेत दिले. “माझ्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असेल स्वराज्य संघटित करणं. आपली ताकद तिथे संघटित व्हायला हवी. मी सांगू इच्छितो की ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात कुणीही वावगं समजू नये. माझी त्यासाठी तयारी देखील आहे. पण पहिल्या टप्प्यात आपण संघटित होणं गरजेचं आहे. स्वराज्य संघटित होण्यासाठी मे महिन्यातच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे”, असं ते म्हणाले.
आपल्याला अजून राजकारण समजत नसून शिकत असल्याची मिश्किल टिप्पणी संभाजीराजे भोसलेंनी यावेळी केली. “मला राजकारण अजून समजत नाही. आता कुठे शिकायला लागलोय. मी सर्व २९ अपक्ष आमदारांची भेट घेणार आहे. त्यात काही चुकीचं नाही. तुम्हाला राज्यसभा खासदारकीसाठी १० आमदारांचं अनुमोदन लागतं. मी सर्व प्रमुख नेत्यांची देखील भेट घेणार आहे. मी आज ठरवलंय की अपक्ष म्हणून राज्यसभेवर जायचं. याप्रकारे त्यांना सन्मान करायचा असेल, तर चांगलंच आहे. नाहीतर आपला मार्ग सुरू आहेच. कुणी पक्ष काढणं हे काही चुकीचं नाहीये. दुसऱ्यांनी काढायचा आणि आम्ही काढायचा नाही असं काही आहे का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“मी वेळप्रसंगी लोकसभा देखील लढवेन. असं मी म्हटलोच नाही की लोकसभा निवडणूक लढवणार नाही. महाराष्ट्रातील काही मोजके लोक असे आहेत की जे कुठूनही निवडणूक लढवू शकतात. त्यातला मी एक आहे. माझी माझ्याशीच स्पर्धा आहे. मी सर्व शिवभक्त, शाहूभक्तांना संघटित करण्यासाठी हे करतोय. त्याचा वेगळा अर्थ ज्यांना काढायचाय त्यांनी काढावा”, असं ते म्हणाले.
दरम्यान, धार्मिक मुद्द्यांवरून सुरू असलेल्या राजकारणावर यावेळी संभाजीराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. संघटनेचं चिन्ह ठरलंय का? अशी विचारणार होताच ते म्हणाले, “अजून चिन्ह किंवा रंग ठरवलेला नाही. जसं दौऱ्यात जाऊ, तिथे लोक सांगतील. पण रक्तात आणि ह्रदयातला केशरी पट्टा तर कुणी काढून घेऊ शकत नाही”, असं ते म्हणाले.

Leave a Reply