समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे – रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना भावनिक साद

मुंबई : १२ मे – महाराष्ट्रातील राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेला जाईल याचा आताच अंदाज बांधता येणार नाही. कारण राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी त्याच्याच प्रत्यय देत आहेत. राज्यातील सध्याचं महाविकास आघाडीचं सरकार हे त्याचचं एक उत्तम उदाहरण आहे. शिवसेना भाजपसोबत असलेली पारंपरिक युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जावून सरकार स्थापन करेल, असं तीन वर्षांपूर्वी कुणालाही वाटलं नव्हतं. पण तेच प्रत्यक्षात घडलं. या राजकीय घडामोडींची आज आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेलं विधान. रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षासोबत एकत्र यावं, असं खुलं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. त्यामुळे आगामी काळात एक वेगळं राजकीय समीकरण उभं राहण्याची शक्यता आहे. पण प्रकाश आंबेडकर यांच्या अनुमतीशिवाय ते समीकरणं उभं राहणं अशक्यच आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवळाली कॅम्प शहरात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना आपल्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आपण प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.
“रिपब्लिकन पक्षाचे नाव मजबूत करण्यासाठी मी देशभर फिरतो आहे. कोणी वंचितचे नाव देते कोणी इतर. पण मी कायम रिपब्लिकन राहणार. रिपब्लिकन पक्षाला आपल्याला व्यापक बनवायचे आहे. सगळ्या जातीच्या लोकांना त्यात आणायचे आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही त्यांचा माणूस निवडून आला नाही. निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे चार मोठे पक्ष, मनसे पण एक आहे. आपण एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझे नम्र निवेदन आहे की, समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आपण माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा. नेतृत्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply