जवाहर राठोड यांची ती कविता म्हणजे कष्टकऱ्यांच्या व्यथा, जी टीका करायची तर करू देत – शरद पवार

पुणे : १२ मे – उपराकार लक्ष्मण माने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात कष्टकऱ्यांच्या व्यथा सांगताना शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली. या कवितेनंतर पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले, अशी टीका भाजपने केली. याच कवितेमुळे सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलाय. स्वत: शरद पवार यांनीच या मुद्द्यावर भाष्य करुन भाजपला प्रत्युत्तर दिलं. “भाजपला टीका करायची तर करु देत पण जवाहर राठोड यांची ती कविता म्हणजे कष्टकऱ्यांच्या व्यथा आहे”, असं म्हणत पवारांनी ती कविता पुन्हा एकदा सादर करुन भाजपला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.
भारतीय भटके विमुक्त आणि संशोधन संस्थेने आयोजिक केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपले विचार मांडताना, कष्टकऱ्यांची व्यथा सांगताना जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली. या कवितेने भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. खुद्द पवारांनीच आज भाजपच्या टीकेला खास त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. “टीकेला आम्ही घाबरत नाही. ज्यांना टीका करायची असेल त्यांनी खुशाल करा, पण जवाहर राठोड यांची कविता म्हणजे कष्टकऱ्यांच्या व्यथा आहे, आम्ही देव घडवले आणि आम्हालाच तुम्ही आडवताय या कष्टकऱ्यांच्या वेदना आहेत”, असं पवार म्हणाले.
तुमचा देव ब्रह्म, विष्णू, महेश, सरस्वती… यांना आम्ही रुपडं दिलं
आता तुम्ही खरं सांगा, ब्रह्मदेव आमचा निर्माता की आम्ही ब्रह्मदेवाचे पिता??
आमच्या छन्नी आणि हातोड्यासाठी कार्ल मार्क्ससारखा आधुनिक योद्धा
आमच्याजवळ इंद्राचं सोंग घेऊन आला…!
शरद पवार नेहमीच हिंदू धर्माची बदनामी करतात. जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते, असा निशाणा साधत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शरद पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता.

Leave a Reply