संपादकीय संवाद – अपरिपक्व राजकारण करून शिवसेना स्वतःसाठीच खड्डा खणत आहे

लोकसभा सदस्य नवनीत कौर राणा आणि विधानसभा सदस्य रवी राणा यांचे प्रकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ज्या पद्धतीने हाताळत आहे, ते बघता शिवसेना उगाचच राणा पती-पत्नींना मोठे करत आहेत, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यांना न्यायालयाने जामीन दिल्यावर त्यांना अनुल्लेखाने मारणे शिवसेनेच्या दृष्टीने जास्त योग्य राहिले असते, मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीकास्त्र सोडणे, त्यांच्या विरुद्ध पुन्हा न्यायालयात जाणे, नवनीत रानांचा एमआरआय चालू असतानाचे फोटो बाहेर का आले? म्हणून लीलावती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला धारेवर धरणे यामुळे राणा दाम्पत्याला अकारण प्रसिद्धी मिळत आहे. आणि माध्यमे त्यांना मोठे करीत आहेत.
वस्तुतः राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचणार म्हटल्यावर त्याला सरकारने विरोध करणे चुकीचे होते, कायद्याच्या चौकटीत राहून हनुमान चालीसा वाचा अशी सूचना दिली असतो, तर त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार आणि शिवसेनेची शान राहिली असती, मात्र सुरुवातीपासून मुख्यमंत्री आणि शिवसेनेने हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला. राणांना आधी अमरावतीत अडवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मुंबईतील त्यांच्या घरासमोर शिवसेनेने निदर्शने केली. मातोश्रीसमोरसुद्धा गोंधळ घातला, नंतर पोलिसांच्या सूचनेवरून राणा दाम्पत्याने आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तरीही त्यांना अटक करून राजद्रोहाचे कलम लावण्यात आले. त्यांना पोलीस आणि न्यायालयीन कोठडी डांबण्यात आले. तिथे त्यांच्यावर अत्याचारही झाल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली आहे. हा सर्वच प्रकार अनाठायी होता.
जर शिवसेनेने राणा दाम्पत्याला शांतपणे हनुमान चालीसा चे पठण करू दिले असते, तर २४ तासात महाराष्ट्रातील जनता हे प्रकरण विसरली असती, मात्र आज तीन आठवडे झाले तरी राणा दाम्पत्याच्या नावे मंथन सुरु असून त्यातून निघणारे नवनीत शिवसेनेसाठी धोक्याचे आहे. हा मुद्दा लक्षात घेतला जात नाही.
काल नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढून त्यांना पराभूत करण्यासाठी आव्हान दिले आहे, त्याचप्रमाणे मुंबईत महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्याची घोषणा केली आहे, त्यालाही शिवसेनेतर्फे देण्यात येणारे प्रति आव्हान हा अपरिपक्व राजकारणाचाच प्रकार म्हणावा लागेल. हा प्रकार दुर्लक्षिला असता तर त्यात ठाकरेंचा मोठेपणा दिसला असता;

गेल्या दोन वर्षांत शिवसेनेने अनेक टप्प्यांवर असे अपरिपक्व राजकारण केल्याचे दिसून आले आहे. त्यात कंगना राणावत, यांचा विरोध असो, अर्णव गोस्वामींची अटक असो, किंवा नारायण राणेंना अटक करण्याचा प्रकार असो, असे अनेक प्रकार या सरकारच्या खात्यावर जमा आहेत त्यातून शिवसेनेने त्या त्या व्यक्तींना अकारण मोठे केले आहे.
सत्तेचे राजकारण करायचे तर राजकीय नेतृत्वाने परिपक्व आणि समंजस असणे गरजेचे असते शिवसेना नेतृत्वाला हे लक्षात येईल तो शिवसेनेच्या दृष्टीने सुदिन म्हणावा लागेल. तोवर तरी शिवसेना या सर्व प्रकारातून स्वतःसाठीच खड्डा खणत आहे. हे नक्की.

अविनाश पाठक

Leave a Reply