लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

नागपूर : ९ मे – शहरातील बेलतरोडी पोलिस ठाणे हद्दीत तरुणीसोबत अत्याचाराची घटना पुढे आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत हे कृत्य करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत सतीश जैस्वाल (वय २९) असे आरोपीचे नाव आहे.
दुर्गानगर चौक, अकोला निवासी संकेत याची पीडितेसोबत तिच्या मैत्रिणीच्या लोणावळय़ात आयोजित पार्टीमध्ये भेट झाली होती. त्यानंतर त्यांची ओळख मैत्रीत बदलली आणि त्यांचा मोबाईलवर संवाद सुरू झाला. हळूहळू एकमेकांच्या गोष्टी सांगतानाच त्यांच्या प्रेमाच्या रुळावर गाडी धावू लागली आणि त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले. दरम्यान, त्यांच्या भेटीगाठी आणि बोलणे सुरू असतानाच आरोपी संकेत याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखविले. दोघांमध्ये प्रेम असल्यामुळे तिनेही होकार दिला. परंतु, लग्नाच्या आमिषाच्या बहाण्यातून आरोपीने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले. बेलतरोडी येथील हॉटेलमध्ये त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडितेने त्याला लग्नासंदर्भात विचारणा केली. तर, तो तिला टाळटाळ करू लागला. तिने त्याला वारंवार विचारले असता तो तिच्याशी पूर्वीप्रमाणे वागत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने बेलतरोडी पोलिस ठाणे गाठले. येथे तिने त्याच्या प्रियकराविरुद्घ तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply