बकुळीची फुलं : भाग २९ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

नागपूर स्टेशनवरून आम्ही परत आलो . आणि मनात येत होतं तेच आणि तसंच दादा म्हणालेत
“बघ मी म्हणत होतो ना, मिलीटरीतला मुलगा नको . हे असंच असतं , कध्धीही बोलावतात , कधी क्वार्टर रिकामे करावे लागतात , बदल्या होतात . मुलगा चांगला असला तरी काय फायदा ? संसार तर
वा-यावरच ना ?”
मी किंवा आई काही बोललो नाही. दिल्लीला जाऊन आठ दिवस झाले पत्र नाही. मनात नसतीच काळजी. मग एक पत्र आलं केवळ दोन ओळींचं पोस्टकार्ड. त्यात लिहीलं होतं,
“प्रिय शुभांगी ,
मी दिल्लीला सुखरूप पोहचलो . आणि आमच्या महत्वाच्या कामाला सुरुवात केली . सुट्टी तर इतक्यात मिळणं शक्य नाही. पण जेव्हा मिळेल तेव्हा येईना .तुझ्या पेटीत मी पाचशे रूपये ठेवलेत . अधिक नव्हते ..
कळवीनच पुढे. आणि पत्ताही कळवीन.”
नंतर रोज पत्राची वाट पहाण्यात गेले आणि त्यांचं पत्र आलं . लिहिलं होतं कार्डावर केवळ आणि केवळ पत्ताच , त्यांच्या ऑफीसला फोन नंबर.
मला मनातून रडावंसं वाटलं. ” हे मिलीटरीचे लोक भावनाशून्य असतात की काय ? दोन्ही पत्र लिहिण्यासाठी अंतर्देशीय पत्र सुध्दा त्यांना मिळालं नाही ?
दुस-या पत्रात केवळ पत्ता ? ही काय रीत झाली ? मनात ना. सी फडकेंच्या प्रेमभ-या कादंब-या होत्या . ययाती होती, खांडेकरांची . पण मिलीटरीतल्या माणसाला प्रेमबिम काहीच माहीत नसणार.
मी आता दिलेल्या पत्त्यावर अंतर्देशीय पत्रात त्यांना खुप काही विचारणार होते. मी पोस्टात जाऊन आठ अंतर्देशीय घेऊन आले .
पहिलंच पत्र. काय लिहावं हा विचार करण्यात , रफ फेअर लिहून पाहण्यात दिवस गेला .
आणि दुस-याचं दिवशी पेपरमधे बातमी आली .
” भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात”
एप्रिल चा महिना सुरू झाला होता. आकाशातला सूर्य आग ओकत होता . वातावरण तापलं होतं मनातही अस्वस्थता दाटून आली होती .
दादा आता काही बोलत नव्हते . मला म्हणाले .
“पत्र लिही काय ते कळेल . “
आई म्हणाली , शुक्रवार तलावाजवळ एक्स्प्रेस डिलीव्हरी व्हॅन येते . त्यात पत्र टाकलं की खुप लवकर पोहचतं.”
आजच्या स्पीड पोस्ट सारखी पत्रं लवकर पोहचत असावीत . पण ह्यांच्याकडून उत्तरच येत नव्हतं .
मी तर वाट पाहून निराश झाले .
दर आठवडी पत्र टाकण्याचा क्रम सुरू ठेवला .
एप्रिल पासून युद्ध सुरू झालं. आणि माझा जीव टांगणीला लागला . त्यावेळी एक विचार आला . हजारो सैनिक ह्या युद्धात सामिल आहेत , मी एकटीच दु:खी नाही. माझ्यासारख्या अनेक मुलींची लग्न ह्याच काळात झालेली असतील. त्यांनाही माझ्याच सारखं दु:ख असणारच .
ह्या विचाराने धीर आला . पण रस्त्याने जातांना , कोणीतरी भेटायचं , म्हणायचं ,
“काय ग बाई तुझं नशिब , हाच मिळाला तुला ? खरंच दया येते तुझी. “
आता मी ही सावरले होते . मी ही उत्तर देत होते.
“युद्धात सहभागी झालेले पळपुटे नसतात. ते शूर सैनिक असतात . सैनिक लढले नसते तर आपण स्वातंत्र्य तरी पाहिलं असतं का ?
आणि १८५७ पासून १९४७ पर्यंत किती सैनिकांनी स्वतः ला राष्ट्रसमर्पित केलं . हे आपण वाचलं आहे ना ?”
कुणी मग मला बोलत नव्हतं पण सहानुभूती त्यांच्या डोळ्यात दिसायची .
एकमात्र मनात सतत यायचं. आई जरी आपल्या बाजूने होती तरी दादांनी कधीही न उच्चारलेले परंतु त्यांच्या मनात असलेले शब्द मी मनोमन वाचले होते.
“बघ मी म्हणत होतो ना, सैन्यात असलेल्या व्यक्तीचं घर फिरतं , जीवाचंही काही खरं नाही. मुद्दाम कशाला आगीत हात टाकून भाजून घ्यायचं ?”
आता तेही काळजीत होते. बोलत नसले तरी दिसत होतं .
१९४७ मधे भारत पाकिस्तान वेगळं झालं. पण त्यांनी काश्मीर बळकावलं म्हणून कश्मीरसाठी युद्ध झालं. त्यांनी आपलं सैन्य कश्मीरच्या बाजूने घुसवलं . पाच महिने ते युद्ध सुरू होतं. युद्धात हजारो लोक दोन्हीही बाजूचे मारले गेले .
आणि १९६५ ला पुन्हा कश्मीरच्या बाजूने आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करून पाकीस्तानाने आपली सेना घुसवली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून हे युद्ध होतं. पुन्हा एकदा शेकडो लोक मारले जाणार होते.
**तेव्हा ताश्कंदला वाटाघाटी होऊन युद्ध बंद झालं पण त्यात ताश्कंद ला पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा अनाकलनीय मृत्यू झाला .

एप्रिल , मे संपला कुठेही एका ओळीचंही पत्र नव्हतं . दादा म्हणाले
” पुन्हा शाळेत नोकरी बघ, अशी घरी बसून काय करशील ?”
आणि देवासारखा सासूबाई आल्या . म्हणाल्या
“चल, आपण मुंबई ला माझ्या भावाकडे जाऊ . आळंदी , पंढरपूर करून येऊ तोवर येईलच मुकुंदा”
आणि त्यांच्यासह मी मुंबईला निघाले. एक वेगळाच अनुभव . सासू आणि सून लग्नानंतर प्रवासाला निघाल्याचा.
आता पुढे….

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply