चकमकीत मारला गेलेला गुंड विकास दुबे याची ६७ कोटींची मालमत्ता जप्त

लखनौ : ९ मे – प्रसिद्ध बिकरू घटनेनंतर चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या नातेवाईकांची ६७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कानपूरच्या जिल्हा न्यायालयाने विकास दुबे आणि त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. विकास दुबे आणि त्यांच्या काही नातेवाईकांच्या मालमत्तेबाबत कानपूरच्या एसपी आऊटरने डीएम कानपूर कोर्टात अहवाल सादर केल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला. न्यायालयाने बिकरू, चौबेपूर, कानपूर देहाट, लखनौ येथील १३ स्थावर आणि १० जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. तहसीलदार स्तरावरील अधिकाऱ्याची मालमत्तांवर रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली जाईल आणि त्यांची स्वाक्षरी असेल. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विकास दुबे यांच्या पत्नी, आई आणि दोन्ही मुलांची मालमत्तांचा समावेश आहे.
यासोबतच विकास दुबे यांचे रोखपाल जय वाजपेयी यांच्याविरोधातही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जय वाजपेयी यांच्या विरोधात EOW चौकशी करणार आहे. अधिवक्ता सौरभ भदौरिया यांनी जय वाजपेयींसह ५३ लोकांविरुद्ध प्रशासनात तक्रार केली होती. त्यानंतर आता जय वाजपेयींसह ५३ जणांची चौकशी केली जाणार आहे.
२ जुलै २०२० रोजी यूपीच्या कानपूरमध्ये बिकरूची घटना घडली होती. या प्रकरणात विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या बिकरू गावात पोलिसांवर गोळीबार केला होता. यात ८ पोलिस शहीद झाले होते. या घटनेनंतर विकास दुबे फरार झाला होता. पोलिसांनी कारवाई करत विकासच्या अनेक साथीदारांसोबत चकमक केली आणि विकासला १० जुलै रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पकडण्यात आले. विकास दुबेला अटक केल्यानंतर यूपी पोलीस आणि एसटीएफ विकासला रस्त्याने कानपूरला आणत होते, पण कानपूरला पोहोचण्यापूर्वीच यूपी पोलिसांची त्याच्याशी चकमक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने वाटेत पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर देत चकमकीत ठार केले.

Leave a Reply