एक लाखाची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदाराला रंगेहात अटक

नागपूर : ९ मे – शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याचे हवालदार रामनाथ चौधरी यांना रविवारी लाचलुचपत प्रतिबंध विभाग (एसीबी) ने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. या हवालदाराने ले-आऊट मालिकाच्या विरुद्ध कारवाई न करण्यासंदर्भात ही लाच मागितली होती. अशातच, आरोपी हवालदाराला एका चहाच्या दुकानात लाच घेताना अटक करण्यात आली.
या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता यांनी अभिन्यास (ले-आऊट) टाकले होते. यातील भूखंड दोन जणांना विक्री केले होते. दरम्यान, एका भूखंड खरीदराने खरेदी संदर्भात तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी हवालदार चौधरी हे करीत होते. परिणामी त्यांनी तक्रारकर्त्यांशी संपर्क केला. त्यानंतर चौधरी यांनी तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवरून कारवाई न करण्याकरिता तसेच तपासणीत मदत करण्याकरिता एक लाख रुपये ले-आऊट मालकाला मागितले. परंतु, त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. विभागाच्या पोलिसांनी तक्रारीचे निरीक्षण केल्यानंतर रविवारी सापळा रचला. सापळय़ानुसार रविवारी संध्याकाळी जवळपास ७.३0 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलिस ठाणे येथील चहाच्या दुकानात रकम देण्याची जागा ठरली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कर्मचार्यांची तैनाती करण्यात आली. वास्तविकता रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शहरात असल्यामुळे शहरातील मोठय़ा प्रमाणातील पोलिस कर्मचारी हे पोलिस बंदोबस्तात होते. याचा फायदा घेत चौधरी यांनी पैसे देणार्याला बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळय़ानुसार तक्रारकर्ते लाच देण्याकरिता ठरलेल्या चहाच्या टपरीवर पोहचले. त्यांनी लाच दिली आणि चौधरी यांनी ती लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. याप्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply