संजय राऊत चवन्नीछाप – रवी राणा

मुंबई : ८ मे – अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटका केल्यानंतर मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर रवी राणा यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच नवनीत राणा यांची तब्येत ठीक असून आज त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं त्यांनी सांगितलं. आता लढण्याच्या निर्धाराने त्या बाहेर पडणार आहेत, असंही राणा यांनी म्हटलं आहे.
मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहेत. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात. आम्हाला 20 फूट खोल गाडण्याची धमकी देतात. संजय राऊतांवर महाराष्ट्रावर गुन्हा दाखल होत नाही. पण हनुमानाचे नाव घेतल्यावर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे राणा म्हणाले. मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. कोर्टाने जो निर्णय दिला त्याचे आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केलं असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं.
जेव्हा पोलीस आमच्या घरी आले होते तेव्हा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुम्हाला जामीन देण्यात येईल असे सांगितलं. आम्ही वॉरंट मागत असतानाही त्यांनी तडकाफडकी आम्हाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गाडीत बसताना शिवसैनिकांनी आमच्यावर दगड, पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्याच्यावर कारवाई केली नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिलं नाही, असं रवी राणा यांनी म्हटलं.

Leave a Reply