राजकारण करा पण त्यासाठी दर्जा असला पाहिजे – मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई : ८ मे – आजकाल वैचारिक प्रदूषण वाढलयं. राजकारण करा पण त्यासाठी दर्जा असला पाहिजे. विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष नव्हे. चांगले काम केले त्याचे कौतुक करणे ही दिलदारी विरोधी पक्षात नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमधील सर्व निवासी नागरिकांना ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ( 7 मे ) करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई शहर पालक मंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
बदलती मुंबई बघत आम्ही मोठे झालो. पाणी देण्याच्या कार्यक्रमात राजकारण आणायचे नाही. संत गाडगेबाबा बोलले होते तहानलेल्याला पाणी. ते काम आपण करत आहोत. पावसाळ्यात मुंबई तुंबते त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. यंदा हिंदमाता तुंबणार नाही, यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहे. बाकी थाप मारणारे भरपूर, पण कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.
सर्वांसाठी पाणी हे धोरण आज मंजूर केले जात आहे. सर्वांना पाणी देताना ते पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न आहे. जंगल कापून पाणी आणणे आपल्याला परवडणारे आहे का?, सध्या तापमान वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंग आहे. विकास करताना नागरिकांना त्रास होता कामा नये, या तत्वानुसार काम करत आहोत. थापेबाजी चालणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.
काम करू द्यायचे नाही. भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातो, याची खंत व्यक्त करत राजकारण करा, पण त्यासाठी दर्जा असला पाहिजे. विरोध करणे म्हणजे विरोधी पक्ष नव्हे. चांगले काम केले त्याचे कौतुक करणे ही दिलदारी विरोधी पक्षात नाही. तसेच, येत्या १४ तारखेला मनातले बोलेन, असेही मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply