स्वदेशीला चालना देण्यासाठी देशात आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल – नितीन गडकरी

पुणे : स्वातंत्र्यानंतरची चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्टाचारी शासन व दिशाहीन नेतृत्वामुळे देशाचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर, सुखी, समृद्ध व शक्तीशाली भारताच्या निर्मितीचा विचार करत आहोत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आधीच्या सरकारांवर टीकास्त्र सोडले. स्वदेशीला चालना देण्यासाठी देशात आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो) पुणे शाखेच्या वतीने आयोजित जीतो कनेक्ट २०२२ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ऑनलाइन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. देशाच्या आर्थिक विकासाला आकाश खुले आहे. आपला देश श्रीमंत आहे. परंतु, लोकसंख्या गरीब आहे. देशात १९४७ नंतर चुकीची आर्थिक धोरणे, वाईट व भ्रष्ट शासन आणि दिशाहीन नेतृत्वामुळे आपले खूप नुकसान झाले आहे. आता आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहात आहोत. त्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढविण्याविषयी धोरण तयार करावे लागेल. पेट्रोल-डिझेलची आयात कमी करून इथेनॉल, मिथेनॉल, बायोसीएनजी, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, ग्रीन हायड्रोजनचा वापर वाढवावा लागेल, असेही ते म्हणाले.
देशात उद्योजकता वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचबरोबर मजबूत राजकीय इच्छाशक्ती, विकासाचा योग्य दृष्टीकोन आणि सामाजिक उत्तरदायित्व व संवेदनशीलतेची भावना आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply