वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार

गडचिरोली : ४ मे – गडचिरोली तालुक्यातील शिवराजपूर-उसेगाव या मुख्य मार्गांने उसेगावला जायला निघालेल्या जोडप्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून २४ वर्षीय इसमास ठार केल्याची दुर्देवी घटना दुपारी २ वाजताच्या च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये नरभक्षक वाघाप्रती चांगलीच दहशत माजली आहे. दरम्यान अवघ्या २0 दिवसाच्या अंतरातच ही दुसरी घटना घडल्याने सदर नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील चोप येथील अजित सोमेश्वर नाकाडे(२४) हा देसाईगंज येथील एका मुलीसोबत शिवराजपुर- उसेगाव या मुख्य मार्गांने उसेगावला जायला निघाला होता. दरम्यान दोघेही उसेगाव जंगल परिसरात लघुशंकेसाठी मोटारसायकल वरुन उतरले असता झुडपाआड दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अजित नाकाडे याचेवर हल्ला करून नरडीचा घोट घेतला. दरम्यान सोबत असलेल्या मुलिने सदर मुलाला ओढण्याचा प्रयत्न केला असता वाघाने तिच्यावरही पंजा मारुन जखमी केले, सुदैवाने यात मुलगी मात्र सुखरुप बचावली आहे.
घटनेची माहिती मिळताच वडसा वन विभागाचे वनाधिकारी सहाय्यक उप वनसंरक्षक मनोज चव्हाण,वन परिक्षेत्राधिकारी विजय धांडे, वनरक्षक के. व्हाय कर्हाडे व देसाईगंज पोलिस घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिम राबवली असता घटनास्थळापासुन ३0 मिटर अंतरावर वाघाने नरडिचा घोट घेतलेल्या स्थितीत अजित नाकाडाचे मृतदेह आढळून आला. घटनेचा पंचनामा करुन प्रेत ताब्यात घेण्यात आले. दरम्यान देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. घटनेचा मर्ग देसाईगंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वडसा वन विभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबियास आमदार गजबे यांचे हस्ते तत्काळ १५ हजाराची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

Leave a Reply