मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

मुंबई : ४ मे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. तर, दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांकडून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. या दरम्यान एक महिला पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणी वाढण्याच्या दाट शक्यता आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे. मनसेच्या या दोन्ही नेत्यांना पोलीस ताब्यात घेत होते. त्यावेळी या दोघांनीही पोलिसांना गुंगारा दिला पळ काढला. मात्र, या दरम्यान एक महिला पोलीस जखमी झाली. त्यामुळे आता पोलिसांकडून ही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. अनेक ठिकाणांहून मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही ठिकाणांहून भोंगे लावून आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply