राहुल गांधी यांच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देतांना काँग्रेसचा पंतप्रधानांना टोला

नवी दिल्ली : ३ मे – राहुल गांधी यांच्या एका व्हिडीओमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगू लागला आहे. हा व्हिडीओ एका पार्टीमधला असून त्यावरून भाजपानं राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “मुंबईला वेठीस धरलं जात असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात अनेक स्फोट होत आहेत तेव्हा ते नाईट क्लबमध्ये आहेत”, अशा शब्दांत भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केल्यानंतर आता काँग्रेसकडून त्यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात भूमिका मांडली आहे. यावेळी सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचा देखील दाखला दिला आहे.
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या खुलाशानुसार हा व्हिडीओ राहुल गांधींच्या एका मैत्रीणीच्या लग्न समारंभातला आहे!
रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा केला आहे. “राहुल गांधी नेपाळला गेले होते. ते भारताचं मित्रराष्ट्र आहे. तिथे त्यांच्या एका पत्रकार मैत्रिणीच्या लग्नासाठी ते गेले होते. यात काहीही चुकीचं नाहीये. हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. हा काही गुन्हा नाही. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा लवकरच मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या लग्नाला हजेरी लावणं हा देखील गुन्हा ठरवतील”, असं सुरजेवाला म्हणाले आहेत.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावरून देखील निशाणा साधला. “राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे पाकिस्तानला नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी बिन बुलाए मेहमानसारखे गेले नव्हते. आणि त्यानंतर पठाणकोटला काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे”, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधला.

Leave a Reply