राज ठाकरे यांच्या डोक्यात निश्चितच काही वेगळा प्लॅन असू शकतो – प्रवीण दरेकर

मुंबई : ३ मे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास ३ मे रोजी म्हणजेच आज मनसेच्या प्रत्येक शाखेत आरती करण्याची घोषणा केली होती. मात्र, काल, राज ठाकरेंनी ट्विट करत तुर्तास याला स्थगिती दिली आहे. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंची पाठराखण केलीये. एक पाऊल मागे घेणे म्हणजे माघार नाही, तर दहा पावलं पुढे जाण्याची तयारी असते, असं ते म्हणाले.
“एक पाऊल मागे घेतलं, म्हणजे त्यांनी माघार घेतली असं काही मला वाटत नाही. उलट आणखी पाच पाऊलं जोमाने पुढे जातील. कारण, जेव्हा आपण एखादं पाऊल मागे घेतो, तेव्हा आपण विचार करून दहा पावलं पुढे जात असतो. राज ठाकरे कुठलं आंदोलन अशा प्रकारे करतील, असं मला वाटत नाही, त्यांच्या डोक्यात निश्चितच काही वेगळा प्लॅन असू शकतो”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
औरंगाबादमधील सभेत महाआरती करण्याची घोषणा केली होती. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाही, तर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करु, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला होता. मात्र आता त्यांनी या महाआरतीच्या निर्णयाला तात्पूरती स्थगिती दिली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून मनसैनिकांना ही माहिती दिली.

Leave a Reply