राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी कठोर पावले उचला – गृहमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : ३ मे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून लाउडस्पीकर काढण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
आज झालेल्या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राज्यातील शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेने कठोर पावले उचलण्याचे गृहमंत्र्यांनी दिले. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून काहींना नोटीस देण्यात आल्या आहेत. तेढ निर्माण करताना एखादी व्यक्ती, गट आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील संवेदनशील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले. पोलीस महासंचालकांनी सांगितले की, आम्ही स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या आहेत. राज्यात कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही. जे कायदा बिघडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 15 हजारांहून अधिकजणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीसी कलम 107,110,151,151 (3) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर, 13 हजारांहून अधिकजणांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.
राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या 87 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, 30 हजार होम गार्डच्या जवानांनाही तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक पावले उचलण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply