भंडारा : ३ मे – मनात संशयाने घर केले कि किती मोठा अनर्थ घडतो याची प्रचिती भंडाऱ्यात आली. जादूटोना करत आपल्या पत्नीला मारल्या आरोप एका महिलेवर करण्यात आला. यानंतर एका आरोपीने मित्राच्या मदतीने ४५ वर्षीय महिलेच्या डोक्यावर काठीने वार करत गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली.
भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन अंतर्गत नवेगांव येथे ही घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजहंस कुंभरे, विनोद रामटेके दोन्ही रा. नवेगाव (कोका) यांना अटक केली आहे.
कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथे कपडे धुवायला गेलेल्या बबिता तिरपुडे या महिलेचा २८ एप्रिलला रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. डोक्यावर काठी मारून आणि गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते.
या प्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतेलं आणि त्यांची चौकशी केली. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाला, असा संशय आरोपी राजहंस कुंभरे याला होता. याचा राग मनात धरून सूड घेण्यासाठी त्याने बबिता तिरपुडे हिचा खून केला. मित्र विनोद रामटेके याच्या मदतीने बबिता तिरपुडेचा खून केल्याची कबुली कुंभरे याने पोलिसांना दिली आहे. यानंतर कारधा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास कारधा पोलिस करत आहेत.