ही कृती म्हणजे 56 इंची भित्रेपणा – जिग्नेश मेवाणी

नवी दिल्ली : २ मे – पंतप्रधान कार्यालयातील काही भक्तांनी मााझ्याविरोधात एफआयआर केली. माझ्याविरोधात एका महिलेचा वापर करून खोटा गुन्हा दाखल केला. ही कृती म्हणजे 56 इंची भ्याडता असल्याचा जोरदार हल्लाबोल गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली. आसाममध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर मेवाणी यांनी आज वडनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.
जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले की, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले जात आहेत. त्याशिवाय पेपर फुटीचेही प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. भाजपच्या मंत्र्यावर बलात्काराचा आरोप होतो. मात्र, या प्रकरणात कोणताही FIR दाखल होत नाही. मात्र, माझ्या एका ट्वीटवर माझ्याविरोधात एफआयआर दाखल होतो आणि अटक केली जाते. गोडसेचा भक्त असल्याचे म्हटले की यांना मिरची झोंबत असेल तर त्यांनी (भाजप) एकदा लाल किल्ल्यावरून गोडसे मुर्दाबादच्या घोषणा द्याव्यात असे आव्हान मेवाणी यांनी दिले.
जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले की, माझ्याविरोधात कोणताच खटला होत नसल्याचे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले. ट्वीट करून मी कोणता गुन्हा केला, असा सवालही जिग्नेशने केला. माझ्या ट्वीटमध्ये शांततेचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जे झालं जगजाहीर असल्याचे मेवाणी यांनी म्हटले.
गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ट्वीट केलं होत. याप्रकरणी त्यांना आसाम पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर अटक केली होती. मात्र आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने त्यांना या प्रकरणी मागील आठवड्यात जामीन मंजूर केला होता. कोक्राझार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भावना काकोटी यांनी त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला. या जामीनानंतर महिला अधिकाऱ्याला धक्काबुकी केल्याच्या आरोपात मेवाणींना पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणातही मेवाणींना जामीन देण्यात आला आहे.

Leave a Reply